Tue, Apr 23, 2019 08:03होमपेज › Solapur › सोलापूर, पंढरपूर, मोहोळमध्ये गूढ आवाज?

सोलापूर, पंढरपूर, मोहोळमध्ये गूढ आवाज?

Published On: Sep 11 2018 5:28PM | Last Updated: Sep 11 2018 10:00PMसोलापूर ः प्रतिनिधी 

सोलापूर शहर व पंढरपूर, मोहोळ या ग्रामीण भागांत मंगळवारी सायंकाळी काही ठिकाणी गूढ आवाज आल्याच्या चर्चेला ऊत आला आहे. हा आवाज नेमका कोठून आला याविषयी उलटसुलट चर्चा सुरू झाल्याने यावर जिल्हा प्रशासन सतर्क झाले होते. सोलापूर विद्यापीठाच्या भूगर्भशास्त्र विभागाला या प्रकाराची संपूर्ण माहिती देण्याचे निर्देश देण्यात आले असून, विभागाच्या माध्यमातून या परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याची माहिती जिल्हा आपत्कालीन विभागाचे अधिकारी विशाल बडे यांनी दिली आहे.

सोलापूर शहर व जिल्ह्यातील काही भागांत मंगळवारी सायंकाळी 4 वाजून 20 मिनिटांनी गूढ आवाज आल्याने नागरिकांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली होती. यावर आपत्कालीन विभागाच्या वतीने पंढरपूर, मोहोळ आणि उत्तर सोलापूरच्या तहसीलदारांना घडलेल्या प्रकाराची माहिती देण्यात आली आहे. या परिस्थितीवर लक्ष ठेवून राहण्यास सांगण्यात आले आहे. दुसरीकडे या प्रकारामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये तसेच यामुळे कोठेही आपत्कालीन परिस्थिती उद्भवलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी याचा शास्त्रीयद‍ृष्ट्या अभ्यास करावा. केवळ अफवा पसरवू नये, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. याविषयी सोलापूर विद्यापीठाच्या भूगर्भशास्त्र विभागाला या प्रकाराची संपूर्ण माहिती देण्यात आली असून तांत्रिक माहिती मागविण्यात आली आहे. त्यामुळे हा विभाग घडलेल्या प्रकारवर लक्ष ठेवून आहे. याविषयी अधिक माहिती कळाल्यास तशी माहिती जिल्हाधिकार्‍यांना देण्यात येणार असल्याचेही बडे यांनी सांगितले.  

नेमके काय झाले...

गूढ आवाजाने सोलापूर शहरासह मोहोळ व पंढरपूर तालुका हादरला. आवाज जमिनीतून आला की आकाशातून याचाही नेमका अंदाज बांधता आला नाही इतका तो मोठा होता. आवाज आल्यावर काहींनी आकाशाकडे पाहिल्यावर एखादे सुपरसॉनिक विमान गोलाकार वळून गेल्याप्रमणे त्याच्या धुराच्या रेषांचा पट्टा दिसत होता. सुमारे दोन वर्षांपूर्वीही सोलापूर, पंढरपूर येथे असा आवाज आला होता. त्यावेळी तज्ज्ञांनी हा भारतीय सैन्यदलाचे सुपरसॉनिक विमानांच्या सरावावेळी विमान वातावरणाच्या कक्षेत वेगाने आल्याने होणारा आवाज असल्याचा निष्कर्ष सांगितला होता.