Tue, May 21, 2019 00:20होमपेज › Solapur › सोलापूर : रूग्णवाहिकेमधून चक्क रद्दी वाहतूक (video)

सोलापूर : रूग्णवाहिकेमधून चक्क रद्दी वाहतूक (video)

Published On: Dec 28 2017 5:11PM | Last Updated: Dec 28 2017 5:11PM

बुकमार्क करा
सोलापूर : रणजित वाघमारे

रूग्णांना जीवदान देण्यासाठी रूग्णवाहिकेचा वापर तर सर्वत्र केला जातो. मात्र त्याच रूग्णवाहिकेचा वापर रद्दी वाहतुकीसाठीही केला जात असल्याचे चित्र सोलापूरमधील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सर्रास पाहावयास मिळत आहे. त्याचेच हे बोलके उदाहरण सर्वांना विचार करायला लावणारे आहे. 

रूग्णांच्या जीविताला हानी पोहोचल्यानंतर तात्काळ सेवा म्हणून डॉक्टरांअगोदर अ‍ॅम्ब्युलन्सला सर्वत्र प्राधान्य दिले जाते. सर्वसामान्य नागरिकही अ‍ॅम्ब्युलन्सला कॉल करून रूग्णाला जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी धडपड करतो. अशा तात्काळ अ‍ॅम्ब्युलन्सचा वापर श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रूग्णालयात रद्दी वाहतुकीसाठी केला जातो. त्यामुळे येथील प्रशासनाला, रूग्णवाहिकेच्या वाहनचालकास याचे जराही गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यावर वरिष्ठ काय कारवाई करणार? असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. 

हा प्रकार गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असल्याचे येथील एका अधिकार्‍याने नाव न सांगण्याचे अटीवर सांगितले. ज्यामध्ये जुन्या ‘बी’ ब्लॉक येथे रेकॉर्ड सेक्शन होते. ही इमारत जुनी झाल्याने तेथील रेकॉर्ड सेक्शन ‘सी’ ब्लॉक येथे हलवण्यात येत आहे. त्यासाठी स्ट्रेचर, व्हिलचेअर याचाही वापर करण्यात येत असल्याचे सांगितले. त्यानंतर सध्या अ‍ॅम्ब्युलन्सचाही वापर सर्रास केला आहे.

याबद्दल अ‍ॅम्ब्युलन्सचे वाहनचालक एस.एस. माने यांना विचारले असता त्यांनी अधिष्ठाता डॉ. सुनील घाटे यांचे नाव सांगितले. यावर सोलापूरचे राज्य आरोग्यमंत्री विजयकुमार देशमुख काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये असुविधांचा कहर आहे.  कित्येकवेळा रुग्णांना दिवसभर चाचपडत बसावे लागते. अत्यंत गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांकडेदेखील दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे अनेकदा डॉक्टरांशी रुग्णांचे वाददेखील होतात. त्यामुळे काही वेळा रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना पोलिसांपर्यंत धाव घ्यावी लागत असल्याचे सातत्याने दिसून येत आहे. तरी प्रशासनात कोणताच बदल होताना दिसत नाही.