Sun, Nov 17, 2019 07:57होमपेज › Solapur › चर्चासत्रास शेतकर्‍यांचा ठेंगा; प्रचार, प्रसार झालाच नाही

चर्चासत्रास शेतकर्‍यांचा ठेंगा; प्रचार, प्रसार झालाच नाही

Published On: Mar 19 2018 1:49AM | Last Updated: Mar 18 2018 10:22PMअंबाजोगाई : प्रतिनिधी 

महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा अर्थात आत्मा तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी महाविद्यालय अंबाजोगाई येथे आयोजित कृषी महोत्सव 2018 मध्ये आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रचार प्रसार करण्यासाठी आयोजित केलेल्या कृषी महोत्सवातील चर्चासत्रास शेतकर्‍यांनी ठेंगा दाखविला. व्यासपीठावरून अनेकदा एकत्रित येण्याचे आयोजकांकडून करण्यात आले पण कोणीही शेतकरी आले नाहीत. 

त्यामुळे चर्चासत्राचे पाहुणे वाट पाहून पाहून शेवटी निघून गेले. चर्चासत्रात ए.व्ही. गुट्टे व शास्त्रज्ञ आर.एम. हारे हे पीक व्यवस्थापन व एकात्मिक कीड व्यवस्थापन यावर मार्गदर्शन करणार होते. चर्चासत्रास शेतकरी आलेच नसले तरी रजिस्टरवर पाचशेहून अधिक नोंदी घेण्यात आल्या. बीड जिल्ह्यातील प्रगतशील व प्रयोगशील युवा शेतकरी, महिला शेतकरी यांनी प्रचंड संख्येने भेट देऊन नवनवीन कृषीविकास तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, असे अपेक्षित आहे. 

17  ते 21 मार्च  या कालावधीतील होत असलेल्या कृषी महोत्सवात विविध दालने स्थापन करण्यात आलेली आहेत. पहिल्या दिवशी दोनशेपैकी 79 स्टॉल्स रिकामेच होते. वाटले होते की, दुसर्‍या दिवशी एकही स्टॉल रिकामा राहणार नाही. परंतु सेंद्रिय शेती व गट शेतीचे शेतकरी आपापले साहित्य घेऊन परतल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे निम्म्याहून अधिक स्टॉल रिकामे आहेत. होत असलेल्या कृषी महोत्सवाचा प्रचार व प्रसार झाला नसल्यानेच शुकशुकाट दिसत असल्याचे बोलले जात आहे. 

राजकीय सभा असती तर 

आधुनिक शेतीबद्दल व तंत्रज्ञानाची माहिती ऐकण्यासाठी कृषी महोत्सवात काही शेतकरी आवर्जून तिकीट खर्चून सणासुदीच्या दिवशी सकाळी साडेदहा वाजल्यापासून उपस्थित होते. अखेर दुपारी पाच वाजेपर्यंत चर्चासत्र सुरूच झाले नाही. नंतर रद्द झाल्याचे कळले. त्यामुळे त्यांचा दिवस व तिकिटाचे पैसे वाया गेले. याच ठिकाणी राजकीय सभा असती तर नेत्यांनी तीन महिन्यांपासून गर्दी कशी होईल, यासाठी पराकोटीचे प्रयत्न केले असते. शेतकर्‍यांचा कृषी महोत्सव असल्याने राजकीय मंडळींना काहीच सोयरसुतक नाही, अशी प्रतिक्रिया राग अनावर झाल्याने संबंधित शेतकर्‍यांनी व्यक्त  केली.