Mon, Mar 25, 2019 02:56
    ब्रेकिंग    होमपेज › Solapur › सर्व वारकरी घरी सुखरूप पोहोचावेत : सकल मराठा समाज

सर्व वारकरी घरी सुखरूप पोहोचावेत : सकल मराठा समाज

Published On: Jul 24 2018 11:28PM | Last Updated: Jul 24 2018 11:25PMसोलापूर : प्रतिनिधी

सर्व वारकरी सुखरूप घरी पोहोचले पाहिजेत, सकल मराठा समाजाकडून एसटी बसेसचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही, वारकर्‍यांना त्रास होणार नाही, असा विश्‍वास सोलापुरातील सकल मराठा समाजाच्या पदाधिकार्‍यांनी एसटी प्रशासनाच्या अधिकार्‍यांशी भेट घेऊन दाखविला.

राज्यभरात मराठा आरक्षणावरून आंदोलनाचे लोण पसरले आहे. मुख्यमंत्र्यांनादेखील या मुद्द्यावरून पंढरपूरचा दौरा रद्द करावा लागला. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मराठा आरक्षणाच्या मागणीने जोर धरला आहे. त्यावरून आषाढी एकदशीच्या पार्श्‍वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील अनेक एसटी बसेसना लक्ष्य करत जवळपास 78 एसटी बसेस फोडण्यात आल्या होत्या.

सोमवारी सायंकाळी औरंगाबाद जिल्ह्यात काकासाहेब शिंदे या युवकाने मराठा आरक्षणाच्या मागणीवरून  गोदावरी नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. त्यावरुन राज्यभरात मराठा आरक्षणाचे वादळ उठले. सोशल मीडियावरुन राज्यभरात बंद करण्याचे आवाहन करण्यात येत होते.

परंतु सोलापूर, पुणे व मुंबईला या बंद  मधून वगळण्यात आले असल्याची माहिती आंदोलकांकडून देण्यात आली होती. सोमवारी आषाढी एकादशीचा सोहळा झाल्याने राज्यभरातून पंढरपुरात दाखल झालेले लाखो वारकरी परतीच्या मार्गावर आहेत. हे  वारकरी एसटी व रेल्वेने घरी परत जात आहेत. आषाढी एकदशीअगोदर एसटी बसेस फोडल्या होत्या. त्यामुळे एसटीच्या अधिकार्‍यांनी अनेक मार्गांवरील एसटी बसेस  बंद केल्या होत्या.

परतीच्या मार्गावरील वारकर्‍यांच्या मनात भीती आहे की,  एसटी बसेसवर पुन्हा दगडफेक होईल.परंतु सोलापुरातील सकल मराठा समाजाच्या पदाधिकार्‍यांनी मंगळवारी राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर आगारातील आगारप्रमुख पिंपळकर यांना  भेटून  शेवटचा वारकरी सुखरुप घरी पोहोचला पाहिजे. एसटी बसेस सुरुळीत राहू द्या. कोणत्याही आंदोलकांकडून एसटीची तोडफोड होणार नाही, असा विश्‍वास दाखविला. यावेळी माऊली पवार, रवी मोहिते, गणेश डोंगरे, मोहन चोपडे, सुहास कदम, सोमा चव्हाण आदी उपस्थित होते.