Tue, Sep 25, 2018 09:05



होमपेज › Solapur › असिफाच्या आरोपींना फाशी द्या, पंढरपुरात सर्वधर्मीयांचा मूक मोर्चा

असिफाच्या आरोपींना फाशी द्या, पंढरपुरात सर्वधर्मीयांचा मूक मोर्चा

Published On: Apr 21 2018 2:04PM | Last Updated: Apr 21 2018 2:04PM



 पंढरपूर : प्रतिनिधी
कटुआ येथील 8 वर्षीय असिफा तसेच उणाव, सुरत आणि इतर ठिकाणी घडलेल्या बाल लैंगिक अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात सर्वधर्मीय रस्त्यावर उतरले. या प्रकरणातील आरोपींना तातडीने फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. बाल लैंगिक अत्याचारातील आरोपींना तात्काळ शिक्षा करा, यासाठी  सर्वधर्मीय आणि सर्व पक्षीय नागरिकांनी पंढरपुरात भव्य मूक मोर्चाचे आयोजन केले होते. 

याप्रकरणी शनिवारी सकाळी साडे नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून सुरू झालेला हा मोर्चा लहान मुलींच्या नेतृत्वाखाली मूकपणे, शांततेत तहसील कार्यालयापर्यंत आला. मोर्चाच्या मार्गातील राजमाता अहिल्यादेवी, राष्ट्रमाता जिजाऊ, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मुलींच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मोर्चा पुढे मार्गस्थ झाला. तहसील कार्यालय या ठिकाणी आल्यानंतर फक्त मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या मुलींनीच आपले मनोगत व्यक्त केले. 

या मोर्चा मध्ये मुस्लिम, हिंदू, नवबौद्ध धर्मातील महिला, युवक, पुरुष आणि वयोवृद्ध नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार भारत भालके, आमदार प्रशांत परिचारक, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले यांच्यासह सर्व पक्षीय राजकीय नेते, पदाधिकारीही उपस्थित होते. मोर्चात सहभागी महिलांच्या हातात विविध मागण्या करणारे आणि लैंगिक अत्याचार घटनेचा निषेध करणारे फलक होते. मोर्चा तहसीलदार कार्यालयावर आल्यानंतर नाजिया शेख, सिद्दीका जुबेर बागवान , गैासिया अनवर खान, बुशरा बागवान, मदीहा भडाळे, समन मीरजकर यांनी नायब तहसीलदार यांना निवेदन दिले. या मोर्चात 5 ते 7 हजार नागरिक उपस्थित होते.  

Tags :  All Community,  Pandharpur, Mukmorcha,Justice For Asifa