Sat, Jul 20, 2019 15:00होमपेज › Solapur › दारूच्या जाहिरातबाजीचे निर्बंध धाब्यावर

दारूच्या जाहिरातबाजीचे निर्बंध धाब्यावर

Published On: Jul 19 2018 1:40AM | Last Updated: Jul 18 2018 10:01PMसोलापूर : रामकृष्ण लांबतुरे 

वाईन शॉप, बिअर शॉप आणि बिअरबार विक्रेत्यांना यापुढे दारूच्या ब्रँडची जाहिरातबाजी करण्यास शासनाने निर्बंध घातले आहेत. याचा सोलापूर राज्य उत्पादन शुल्क विभागास विसर पडला आहे. बर्‍याच ठिकाणी शहरात व हद्दवाढ भागात दर्शनी भागात, शहराच्या विविध भागांमध्ये जाहिरातींचे फलक झळकताना दिसत आहेत. 

ज्याप्रमाणे तंबाखूजन्य पदार्थांवर आरोग्यासाठी अपायकारक असा इशारा देणे बंधनकारक असूनही व्यसनाधिनतेला चाप बसला नाही त्याचप्रमाणे हाही प्रयोग आहे. मात्र शासनाने काढलेल्या आदेशाचे खालच्या स्तरावर काटेकोरपणे पालन होणे गरजेचे आहे. त्यामुळे  ठिकठिकाणी लावलेले जाहिरात फलक तातडीने काढून घ्यावेत अन्यथा गुन्हे दाखल केले जातील,  असा इशारा राज्य उत्पादन शुल्क विभागाने दारू विक्रेत्यांना दिला आहे. मात्र त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होताना दिसून येत नाही.  

दारू विक्री करण्यासाठी वाईन शॉप, बिअर शॉप आणि बिअरबारला राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत परवाना दिला जातो. परवाना मिळाल्यानंतर विक्री वाढण्यासाठी दुकान मालक व चालकांकडून विशेषत: उत्सवाच्या काळात दुकान फलकांवर व इतर ठिकाणी दर्शनी भागात सेलिब्रिटीजचे फोटो वापरुन दुकानाची जाहिरात केली जाते. मद्य शौकिनांना आकर्षित करणे हा या मागचा हेतू असतो. मात्र यापुढे दारूची जाहिरात करणार्‍यांविरोधात कडक कारवाईची अंमलबजावणी केली जाणार आहे.   

सध्या सर्वच मद्य विक्री आणि पुरवठा करण्याच्या ठिकाणी सर्रासपणे जाहिराती आढळून येतात. त्यामुळे उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने शहर, जिल्ह्यातील वाईन शॉप आणि बिअर शॉपधारकांना जाहिरातींचे फलक काढून घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

दारू दुकानाच्या बाहेर लावण्यात येणार्‍या जाहिरात फलकावर कोणत्याही दारूच्या बाटलीचे, एखाद्या स्त्रीचे आणि दारूच्या कंपनीचे नाव लावता येणार नाही. तसेच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नामफलकाच्या बोर्डावर लाईटिंगही करण्यास निर्बंध घातले आहेत.  केवळ दुकानाचे नाव, लायसन्स नाव आणि लायसन्स नंबर इतकेच दुकानाच्या फलकावर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र या आदेशाचा कोठेतरी सोलापूर राज्य उत्पादन शुल्कला दाट विसर पडल्याचे पहावयास मिळत आहे.  तसेच शहराच्या दाट लोकवस्ती असलेल्या अनेक दारू दुकानांवर विविध कंपनीच्या दारूच्या बँ्रडच्या जाहिराती झळकताना दिसत आहेत. याबाबत उत्पादन शुल्क विभागाने अशा  दारू दुकानांवर त्वरित कारवाई करून त्यांच्या दुकानासमोरील जाहिरातीचे फलक काढण्याची कारवाई करावी.

शासनाच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. जाहिरातीबाजी करणार्‍यांवर कारवाई केली जात आहे. मात्र विक्री करणे आणि पिण्यास भाग पाडणे यात फरक आहे. शहर-जिल्ह्यात ज्याठिकाणी असे पोस्टर दिसतील, त्याठिकाणी गुन्हे दाखल केले जातील.  - राजेंद्र आवळे  अधीक्षक, रा. उ. शुल्क विभाग