Mon, Jul 15, 2019 23:40होमपेज › Solapur › आदर्श जयंतीचा अकलूज पॅटर्न निर्माण करणार

आदर्श जयंतीचा अकलूज पॅटर्न निर्माण करणार

Published On: Apr 05 2018 11:06PM | Last Updated: Apr 05 2018 10:33PMअकलूज : वार्ताहर

या शहरात 1960 पासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली जात आहे व गेली 23 वर्षे विनावर्गणी हा कार्यक्रम शांततेत पार पाडला जात आहे. हीच परंपरा याहीवर्षी कायम ठेवत डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा अकलूज पॅटर्न निर्माण करण्याचा निर्धार येथील आंबेडकर अनुयायांनी व्यक्त केला. येथील ग्रामपंचायत सभागृहात डॉ.बाबासाहेब आंबेडकर व म. जोतिबा फुले यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मध्यवर्ती उत्सव मंडळाने आयोजित केलेल्या बैठकीत हा निर्धार व्यक्त करण्यात आला.

प्रारंभी अशोक गायकवाड यांनी प्रास्ताविक करून हा उत्सव शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले. यावेळी पोलिस उपनिरीक्षक निलेश गोपाळचावडीकर यांनी पोलिस  बंदोबस्ताची  तयारी पूर्ण झाली असल्याचे सांगून मध्यवर्तीच्या सर्व सदस्य मंडळांनी रीतसर परवानग्या घेण्याचे व पोलिस मित्र म्हणून सहकार्य करण्याचे तसेच मिरवणुकीत डॉल्बी न लावण्याचे आवाहन केले. तर विद्युत मंडळाचे शाखा अभियंता मिरवणुकीत  16 फूट उंचीपेक्षा जास्त उंचीचे देखावे न करण्याचे आवाहन केले. तर यावेळी जयंती कालावधीत गावात सगळीकडे निळे झेंडे लावावे, मिरवणुकीसमोर झान्ज पथक असावे, पुढच्या वर्षी पुतळा मोठा करावा अशा  कार्यकर्त्यातून मागण्या करण्यात आल्या.

यावेळी माजी सरपंच किशोरसिंह माने पाटील व रिपाइंचे ज्येष्ठ नेते नंदकुमार केंगार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना अकलूजमधील जयंतीउत्सव व शांतता याबाबतची ख्याती सांगून तीच परंपरा टिकविण्याचे आवाहन केले. 

यावेळी बोलताना सरपंच शिवतेजसिंह मोहिते -पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या सर्व मागण्या मान्य करून पुढच्या वर्षापर्यंत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्याचे आश्‍वासन दिले.  
बुद्धविहारातील तांत्रिक अडचणी संपल्या असून लवकरच ज्येष्ठ नेते खा.विजयसिंह मोहिते -पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आगळेवेगळे बुद्धविहार उभारण्याचे तसेच अण्णा भाऊ साठे यांचा पंचधातू पुतळा उभारण्याचेही आश्‍वसन दिले. 

रस्ता रुंदीकरणाच्या प्रस्तावामुळे महात्मा फुले यांच्या पुतळ्याचे सुशोभिकरणाचे काम खोळंबले होते मात्र आता ती अडचण दूर झाली असून लवकरच तेही काम सुरू करीत असल्याचे सांगितले. विशाल जगताप यांनी स्वागत केले तर विशाल मोरे यांनी आभार मानले.