Tue, Apr 23, 2019 21:35होमपेज › Solapur › बार्शीत "जलयुक्त शिवार" नंतर आता "जल संजीवनी "

बार्शीत "जलयुक्त शिवार" नंतर आता "जल संजीवनी "

Published On: Sep 12 2018 4:28PM | Last Updated: Sep 12 2018 4:28PMवैराग : आनंदकुमार डुरे

जलयुक्त शिवार अभियानामध्ये  ठसा उमटून पाणी फौडेंशनच्या माध्यमातून आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या बार्शी तालुक्यात आता"जल संजीवनी" हा दुष्काळ सज्जता उपक्रम राबविला जाणार आहे. सोलापूर जिल्ह्यात पहिल्यांदाच राबवल्या जाणाऱ्या ह्या उपक्रमासाठी इर्ले, सुर्डी, यावली, उंडेगाव,रस्तापूर ह्या गावांची निवड करण्यात आली आहे.

शासनाच्या सीएसआर फंडातून ग्रामीण विकासासाठी प्रतिगाव नऊ लाख रुपये अनुदान प्राप्त होणार आहे. यासाठी पाच गावांचा सुसंवाद मेळावा यावली येथे पार पडला. यावेळी या प्रकल्पाचे उद्घाटन ही करण्यात आले. कृषिविकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था, युनायटेड वे मुंबई आणि जॉन डिअर इंडिया प्रा.लि. या तिन संस्थाच्या माध्यमातून " कृषि संजीवनी " हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. 

रस्तापूर, उंडेगाव, इर्ले, यावली, सुर्डी या गावांमध्ये या प्रकल्पांअंतर्गत  गावापातळीवरील सार्वजनिक समस्यांचे निर्मुलन केले जाणार आहे. यात प्राधान्यकमाने मृदा व जल संधारणावर भर दिला जाणार आहे. हा कार्यक्रम पुढील तीन वर्षांसाठी राबवला जाणार असुन यात शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, शेतकरी गटांच्या शेतीशाळा, पशुधन विकास व आरोग्य संवर्धन, महिला बचत गटातील महिलांचे सक्षमीकरण व व्यवसाय निर्मिती असे कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत. 

या कार्यक्रमावेळी कृषिविकास व ग्रामीण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित नाफडे, युनायटेड वे मुंबईचे सत्यम पळसगावकर, अजय गोवले, प्रकल्प समन्वयक रवि पाटील, पांडूरंग पाटील, पाणी फौंडेशनचे समन्वयक नितीन अतकरे, प्रकल्प व्यवस्थापक दर्शना सावंत, बार्शी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण आवारे, धनाजी शिंदे, निलेश उबाळे, संस्थापक शरद कळबट, सरपंच परमेश्वर काकडे, नागनाथ काकडे, सरपंच सचिन उकरंडे, राजाभाऊ डुरे, रघुनाथ सरवदे, दत्ता हुजरे, श्रीहरी चव्हाण, राजेंद्र तुरे, भगवान उकरंडे, संजय डुरे आदी मान्यवरांसह पाच गावातील महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.