Fri, Apr 19, 2019 11:56होमपेज › Solapur › एवढ्या मोठ्या गठ्ठ्याचं करायचं तरी काय...

एवढ्या मोठ्या गठ्ठ्याचं करायचं तरी काय...

Published On: Feb 11 2018 10:41PM | Last Updated: Feb 11 2018 8:59PMपंचायत राज समितीचा दौरा नुकताच पूर्ण झाला. या समितीचे अध्यक्ष सुधीर पारवे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने तीन दिवसांत जिल्हा परिषदेत प्रशासकीय आढावा बैठक व ग्रामीण भागात भेट देऊन पाहणी केली. अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत सोलापूर जिल्हा परिषदेचे काम एक नंबर असून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांचे काम चांगले असल्याचा शेरा समितीप्रमुख पारवे यांनी माध्यमांसमोर दिला. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेने चांगले काम केले, असे म्हणणे सोपे झाले आहे. समितीप्रमुखांनी दिलेल्या शेर्‍यानुसार जि.प. प्रशासकीय काम चांगले आहे, असे मानण्यास हरकत नाही. मात्र समितीचे अध्यक्ष पारवे यांना समक्ष भेटून जिल्ह्याभरातील नागरिकांनी विविध प्रकारची निवेदन व तक्रारी अर्ज दिले आहेत. समितीकडे नेमकी किती निवेदने व तक्रारी प्राप्त झाल्या, अशी विचारणा पारवे यांच्याकडे केल्यानंतर त्यांनी एवढा मोठ्ठा गठ्ठा आलाय, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना याप्रकरणी विषयानुसार सूची करुन कार्यवाही अहवाल एप्रिल महिन्यापर्यंत पाठविण्याच्या सूचना दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले. काही अधिकार्‍यांचे काम चांगले आहे. मात्र काही खातेप्रमुख व कर्मचार्‍यांमुळे अनेक कामांत गैरप्रकार झाला आहे, हीदेखील वस्तुस्थिती आहे. समितीला या सर्व प्रकरणांचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी वेळ नाही. मात्र समितीने या प्रकरणांची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्यावर विश्‍वासाने सोपविली आहे. त्यामुळे या प्रकरणात दोषींविरुध्द कारवाई करुन तसा अहवाल समितीकडे पाठविण्याची नैतिक जबाबदारी आता डॉ. भारुड यांच्यावर आली आहे. पंचायत राज समिती दौर्‍याची तयारी, तोंडावर आलेला मार्च एन्ड, मोठ्या प्रमाणात असलेला अखर्चित निधी आदी विषय डॉ. भारुड यांच्यासमोर प्राधान्याने आहेत, यात कोणतीच शंका नाही. मात्र काम न करतानाच अनेक लोकप्रतिनिधी कम ठेकेदारांनी लाखो रुपयांचा मलिदा हडप केल्याचे पुरावे समितीसमोर अनेक नागरिकांनी दाखल केले आहेत. याप्रकरणील दोषींविरुध्द कारवाई करुन अपहारित किंवा वसूलपात्र रक्कम वसूल करण्याचे आव्हान प्रशासकीय यंत्रणेसमोर आहे. पंचायत समितीकडे तक्रारदारांनी अर्ज केल्यानंतर त्याची दखल घेतली जात नाही. जिल्हा परिषदेकडे तक्रार केल्यानंतर परत कागदीघोडे नाचवून ते घोडे परत पंचायत समितीकडे पाठविण्याचे नाटक वर्षानुवर्षे सुरु आहे. त्यामुळे पंचायत राज समितीपुढे मुख्य सचिवांची अपेक्षित असलेली साक्ष लक्षात घेऊन प्रशासकीय यंत्रणेने या सर्व प्रकरणांची दखल घेणे आवश्यक आहे. हजारो तक्रारी व निवेदने प्राप्त झाल्याने याची सोडवणूक करुन योग्य निर्णय घेण्यासाठी यासाठी स्वतंत्रपणे समिती स्थापन करुन या समितीवर डॉ. भारुड यांचे नियंत्रण असणे आवश्यक आहे. बनावट अपंग प्रमाणपत्रे देणार्‍या डॉक्टरांवर कारवाईची शिफारस करणारा अहवाल शासनाकडे करणे गरजेचे आहे तरच जिल्हा परिषदेच्या कारभारावर कुठेतरी जनतेत विश्‍वास निर्माण होईल अन्यथा ‘पुन्हा ये रे माझ्या मागल्या...’, अशीच गत होईल.