होमपेज › Solapur › अ‍ॅड. सोलनकर खून; ५ जणांना जन्मठेप

अ‍ॅड. सोलनकर खून; ५ जणांना जन्मठेप

Published On: Jan 13 2018 1:15AM | Last Updated: Jan 12 2018 10:28PM

बुकमार्क करा
माळशिरस (तालुका प्रतिनिधी) 

सुळेवाडी (ता. माळशिरस)  येथील अ‍ॅड. नामदेव कोंडीबा सोलनकर यांच्या खून प्रकरणातील पाचही आरोपींना माळशिरसचे जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. आर. पटारे यांनी दोषी धरून जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली  आहे. गजानन रघुनाथ सोलनकर, सर्जेराव भीमराव माने, किसन मुरलीधर सुळे, बीरा वामन माने, तानाजी मिरगप्पा माने (सर्व रा. सुळेवाडी) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.

नामदेव सोलनकर हे आपल्या कुटुंबासह सुळेवाडी येथे राहात होते. त्यांनी सुळेवाडी येथील जमीन गट नं. 633 मधील असणार्‍या समाईक जमिनीतील गणू खंडू माने याच्या मुलाकडून गटातील 6 वा हिस्सा खरेदी केला होता. या जमिनीमध्ये असणार्‍या समाईक विहिरीमध्येही समाईक हिस्सा होता. दि. 23 जून 2016 या दिवशी पाणी भरण्यावरून वाद होऊन गजानन सोलनकर, समाधान चौगुले, सर्जेराव माने, संतोष सुळे, मोहन करे आणि सागर माने यांना बोलावून सर्वांनी मिळून घरावर  दगडफेक केली. 

त्यानंतर अ‍ॅड. सोलनकर यांचा भाऊ व पुतण्या महादेव हे तक्रार देण्याकरिता पिलीव पोलिस ठाण्यात गेले होते. पुतण्या महादेव यास मार लागल्याने त्याला उपचारासाठी अकलूज येथे पाठविण्यात आल्यानंतर अ‍ॅड. सोलनकर व त्याचा भाऊ आपल्या घराकडे निघाले असता, बिरा माने, गजानन सोलनकर, किसन सुळे, तानाजी माने व सर्जेराव माने यांनी मोटारसायकलवरून येऊन नामदेव यांच्या तोंडावर काही तरी टाकले व आरोपींनी त्याच्या हातावर, पाठीवर, पोटात तलवार व गुप्तीने सपासप वार केले. 

याबाबत अ‍ॅड. सोलनकर यांचा भाऊ दुर्योधन याने माळशिरस पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या घटनेचा तपास पो. नि. अशोक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार अभिजित चौधरी यांनी करून माळशिरस जिल्हा न्यायालयात आरोपीविरुद्ध  दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्याची सुनावणी जिल्हा सत्र न्यायाधीश ए.ए. खान व आर. आर. पटारे यांच्या समोर झाली या खटल्यात 13 साक्षीदार तपासण्यात आले. यात प्रत्यक्ष साक्षीदार दुर्योधन सोलनकर, महादेव सोलनकर व वैद्यकीय अधिकारी अमृता तनपुरे यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. 

जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड संतोष न्हावकर, अ‍ॅड संग्राम पाटील यांनी सादर केलेला युक्तीवाद व दाखल केलेले पुरावे पाहुन जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी सर्व पाच आरोपींना जन्मठेप व पाच हजार दंडाची शिक्षा सुनावली. या खटल्यात मुळ फिर्यादी तर्फे अ‍ॅड कालीदास सावंत पाटील अ‍ॅड प्रशांत लोमटे व अ‍ॅड रवीद्र चांगण यांनी काम पाहिले.