होमपेज › Solapur › मुख्यमंत्र्यांच्या पंढरपूर दौर्‍याबाबत प्रशासन सतर्क

मुख्यमंत्र्यांच्या पंढरपूर दौर्‍याबाबत प्रशासन सतर्क

Published On: Jul 20 2018 1:13AM | Last Updated: Jul 19 2018 11:02PMपंढरपूर : प्रतिनिधी

आषाढी यात्रेच्या शासकीय महापुजेकरिता येणार्‍या मुख्यमंत्र्यांना अडवण्याचा ईशारा विविध संघटनांनी दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा दौरा निर्विघ्न पार पडावा याकरिता पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. दोन दिवसांपासून आंदोलनाचे इशारे दिलेल्या सामाजिक संघटनांच्या प्रमुखांच्या संपर्कात पोलीस अधिकारी आहेत. तसेच त्यांच्या मागण्यांसंदर्भात चर्चेची तयारी दाखवली जात आहे. पोलीसांच्या रडारवर असलेल्या कार्यकर्त्यांवर कारवाईची शक्यताही व्यक्त होत आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या 23 रोजी होणार्‍या आषाढी यात्रेच्या महापुजेसाठी पंढरीत येत आहेत. मात्र मराठा, धनगर समाजासह विविध अन्य सामाजिक संघटनांनी मुख्यमंत्र्यांना आपल्या मागण्या मान्य केल्याशिवाय पंढरपूरला येऊ नये त्यांना शासकीय महापुजे करू देणार नाही असा इशारा दिला आहे.  या पार्श्‍वभूमीवर गेल्या आठ दिवसांत पंढरपूर तालुक्यात सामाजिक संघटनांकडून आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. बुधवारी सायंकाळी 8 वाजता एका एस.टी.बसवर दगडफेक करून मराठा आरक्षणाची पत्रके टाकण्यात आली आहेत. तसेच फेसबूक, व्हॉटस् अ‍ॅपवरून राज्यभरातून पंढरपूरला येण्याचे आवाहन केले जात आहे. पंढरपूर तालुक्यासह जिल्ह्यातही विविध तालुक्यात आंदोलनाची तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे आषाढी यात्रेच्यावेळी नेमके काय होईल याचा अंदाज पोलीसांनाही आजच्या घडीला आलेला नाही. 

यासंदर्भात स्थानिक पातळीवर असलेल्या परिस्थीतीचा अहवाल पंढरपूर पोलीसांनी वरिष्ठांकडे पाठवल्याचे समजते. तसेच जिल्हा पोलीस अधिक्षकांकडून विविध मार्गाने स्थानिक पदाधिकार्‍यांना, जिल्हा पातळीवरील पदाधिकार्‍यांना फोन करून, भेटीस बोलावून आंदोलनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. गुप्त वार्ता विभागाच्या पोलीस कर्मचार्‍यांकडून हे आंदोलक कुठे जातात, कुणाला भेटतात त्यांचे काय नियोजन सुरू आहे याचा तपास करीत असल्याचे दिसून येते. येत्या दोन दिवसांत आंदोलकांनी चर्चेला सकारात्मक प्रतिसाद नाही दिला तर या सामाजिक संघटनांच्या प्रमुखांवर कारवाईही केली जाण्याची शक्यता आहे.  आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन यात्रा बंदोबस्तावरील पोलीस कर्मचार्‍यांची संख्या वाढवण्यात आलेली आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍यातील संभाव्य ठिकाणासाठी विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्याचेही नियोजन केले जात आहे. नागरी वेषात आणि वारकर्‍यांच्या वेषातही विविध ठिकाणी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आल्याची माहिती आहे. एकंदरीत आषाढी यात्रेच्या तणावात असलेल्या पोलीस प्रशासनापुढे आरक्षण प्रश्‍नांवरून सामाजिक संघटनांच्या नाराजीचा मोठा प्रश्‍न उभा राहिला आहे. मुख्यमंत्र्यांचा दौरा निर्विघ्नपणे पार पडावा याकरिता पोलीस प्रशासन सर्व तर्‍हेने प्रयत्न करीत असल्याचे दिसते. 

गनिमी काव्याचा पोलीसांनी घेतलाय धसका

12 ते 15 लाख वारकर्‍यांची संभाव्य गर्दी आणि त्या गर्दीत असंख्य आंदोलक गनिमी काव्याने येणार असल्याची माहिती मिळाल्यामुळे पोलीसांनी या गनिमी काव्याचाच धसका घेतल्याचे दिसते. बुधवारी एस. टी. बसवर दगडफेक करून, पत्रके टाकून कार्यकर्ते पसार झाले आहेत. तर शहरातील चार ठिकाणी डिजीटल फलकावर असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या छायाचित्राला काळे फासले आहे. त्यामुळे गनिमी काव्याच्या आंदोलनाचाच पोलीसांनी धसका घेतल्याचे दिसते.