Sat, Aug 24, 2019 12:34होमपेज › Solapur › आदित्य ठाकरे यांचा धावता दुष्काळ पाहणी दौरा

आत्महत्या करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी शिवसेनेची आठवण काढावी : आदित्य ठाकरे

Published On: Feb 12 2019 4:21PM | Last Updated: Feb 12 2019 4:13PM
मोहोळ : वार्ताहर 

राज्यात भीषण दुष्काळी स्थिती निर्माण झाल्याने शेतकरी हतबल होऊन गळ्याला फास आवळून आत्महत्या करीत आहेत. मात्र शेतकऱ्यांनी आत्महत्या करुन आपले कुटूंब उघड्यावर टाकण्यापेक्षा एकदा शिवसेनेची आठवण काढावी, आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आमचे कर्तव्य पार पाडू, या शब्दांत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त करुन नागरिकांशी संवाद साधला.

तालुक्यातील दुष्काळी स्थितीची पाहणी आणि जनतेशी संवाद साधण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी (दि. १२) मोहोळ तालुक्याचा धावता दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी पोखरापूर तलावाला भेट देऊन पाहणी करुन तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर सारोळे येथे शिवसेनेच्या वतीने ग्रामस्थांना पाण्याच्या टाक्या व पशुखाद्याचे वाटप करण्यात आले. यावेळी आदित्य ठाकरे हे नागरीकांशी सवांद साधताना बोलत होते.

यावेळी मंचावर उस्मानाबादचे खा. रविंद्र गायकवाड, जेष्ठ नेते दिपक गायकवाड, जिल्हा प्रमुख गणेश वानकर, उप जिल्हाप्रमुख दादासाहेब पवार, विधानसभा संघटक काकासाहेब देशमुख, तालुकाप्रमुख अशोक भोसले, अस्मीता गायकवाड, जि.प. सदस्या शैलाताई गोडसे, नगरसेविका सीमाताई पाटील, सत्यवान देशमुख, मनोज शेजवाल, उप तालुका प्रमुख नागेश वनकळसे, महेश देशमुख, उपजिल्हा प्रमुख चरण चवरे, हरिभाऊ करंडे, विक्रम देशमुख, आण्णा देशमुख, शहरप्रमुख रणजित गायकवाड, अजय देशमुख, सचिन गायकवाड, बाळासाहेब वाघमोडे, मंगळवेढा तालुका संघटक विजय कलुबर्मे आदी उपस्थित होते. 

यावेळी बोलताना आदित्य म्हणाले म्हणाले की, शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांनी घालून दिलेल्या शिकवणी प्रमाणे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करते. याचाच एक भाग म्हणून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरुनच मी दुष्काळग्रस्त जनतेशी संवाद साधण्यासाठी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाच्या दौऱ्यावर आलो आहे. निवडणुका येतील जातील मात्र अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. तुम्ही मत कोणत्याही पक्षाला द्या, पण संकटाच्या काळात शिवसेना तुमच्या सोबत सदैव राहील, असा विश्वास आदित्य यांनी शेतकऱ्यांना दिला. 

दुष्काळाचे सावट संपूर्ण राज्यावर आहे. या स्थितीशी सामना करताना शेतकरी मेटाकुटीला येणार आहे. मात्र या स्थितीत शेतकऱ्याने हतबल होऊन गळ्याला फास लावून आपले जीवन संपवू नये. त्या आगोदर उघड्यावर येणाऱ्या आपल्या कुटुंबाचा विचार करावा. तसेच आत्महत्येचा वाईट विचार करण्यापूर्वी एकदा शिवसेनेची आठवण काढा शिवसेना तुमच्या प्रत्येक अडचणीत धावून येईल. यावेळी काही शेतकऱ्यांनी त्यांना आंब्याची रोपे आणि ज्वारीच्या हुरड्याची कणसे भेट दिली. 

धावता दौरा केवळ नऊ मिनिटांचा...

आदित्य ठाकरे यांनी मोहोळ तालुक्यातील पोखरापूर आणि सारोळे या दोन गावांचा दुष्काळ पाहणी दौरा केला. मात्र हा दौरा त्यांनी अवघ्या नऊ मिनिटात उरकला. त्यामुळे त्यांचा आजचा दौरा खऱ्या अर्थाने 'धावता' ठरल्याची प्रतिक्रिया या भागातील जनतेकडून व्यक्त करण्यात आल्या.

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबीयांस भेट देण्यास विसरले...

शेतकरी आणि जनता दुष्काळाने होरपळली जात असून शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे दुःख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले. मात्र नापिकी आणि कांद्याला दर न मिळाल्याने आपल्या गळ्याला दोरी लावून जीवन यात्रा संपविणाऱ्या म्हाळाप्पा हरिबा मोटे (रा. दाईंगडेवाडी ता. मोहोळ) या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांची भेट घेवून सांत्वन करण्यास ठाकरे विसरले. त्यामुळे या दौऱ्याचा हेतूच साध्य होवू शकला नसल्याच्या प्रतिक्रीया देखील नागरिकांतून व्यक्त झाल्या.