Mon, Sep 24, 2018 22:49



होमपेज › Solapur › डॉल्बीवर कारवाई होणारच : नांगरे-पाटील

डॉल्बीवर कारवाई होणारच : नांगरे-पाटील

Published On: Sep 11 2018 11:02PM | Last Updated: Sep 11 2018 11:02PM



सोलापूर ः प्रतिनिधी

कायदा प्रस्थापित करण्याचे काम पोलिस करतात. त्यामुळे डॉल्बी साऊंड सिस्टीम लावल्यास कारवाई केली जाणारच आहे. आम्ही उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणार आहोत, अशा शब्दांत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी पोलिसांची भूमिका स्पष्ट केली. 

गणेश मंडळांचे कार्यकर्ते, युवक हे सरकारी नोकर, नागरिक असतात. त्यांच्यावर आम्हाला कारवाई करावयाची नाही, तर पोलिस प्रशासनाची सुरुवातीपासूनच प्रबोधन, जनजागृती, सहकार्याची भूमिका आहे. त्यामुळे आमचा गणेश भक्‍तांवर नाही, तर समाजातील वाईट प्रवृत्तीला विरोध आहे. 

त्यामुळे गणपती मंडळांनीदेखील संघर्षाची भूमिका घेऊ नये, असेदेखील नांगरे-पाटील यांनी सांगितले. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यांच्या आढावा बैठकीनिमित्ताने पोलिस महानिरीक्षक नांगरे-पाटील मंगळवारी सोलापूरमध्ये आले होते. यावेळी पोलिस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते आदींची प्रमुख उपस्थिती होती. नांगरे-पाटील म्हणाले, पाचही जिल्ह्यांतील गणपती मंडळांनी सीसीटीव्ही बसवावेत. त्यामुळे गैरप्रकाराला आळा बसेल. तर दुसरीकडे वाईट प्रवृत्तीला आळा बसण्यासाठी कारवाईही केली जाईल. गणपती उत्सवात लाखो युवक एकत्र येतात. त्यांची क्रयशक्ती रचनात्मक उपक्रमात वापरावी. यावेळी परिक्षेत्रातील गुन्हेगारी आणि कारवाई यावर माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्‍न विचारला असता त्यांनी सांगितले की, आजपर्यंत आम्ही दोन वर्षांत 96 टोळ्यांना मोक्‍का, 636 गुन्हेगारांवर कारवाई, 351 टोळ्या तडीपार, 17 जणांना स्थानबद्ध, निर्भया पथकाच्या माध्यमातून 62 हजार 165 वर कारवाई, 58 हजार 638 जणांना समुपदेशन, त्यासाठी 5 हजार 405 जनजागृतीचे कार्यक्रम घेतले आहेत. आम्ही फक्त कारवाईच करत नाही, तर समस्या मुळापासून संपून जनजागृतीसाठी प्रयत्नशील आहोत, असेही नांगरे-पाटील यांनी सांगितले.