होमपेज › Solapur › आंतरराज्य गुन्हेगारांच्या टोळीवर मोक्‍कांतर्गत कारवाई

आंतरराज्य गुन्हेगारांच्या टोळीवर मोक्‍कांतर्गत कारवाई

Published On: Mar 10 2018 10:37PM | Last Updated: Mar 10 2018 10:30PMसोलापूर : प्रतिनिधी

सोड्डी येथे दरोडा टाकून दुहेरी खून करणार्‍या तसेच मोहोळ येथे पोलिसांवर प्राणघातक हल्ला करणार्‍या आंतरराज्य गुन्हेगारांच्या टोळीवर मोक्‍कांतर्गत कारवाई करण्यास कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी मंजुरी दिली आहे.

मंगळवेढा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील  सोड्डी  येथे  दरोडेखोरांनी  दरोडा टाकून खून केला होता. या गुन्ह्यामध्ये छग्या  ऊर्फ  छगन  गंगाराम शिंदे व त्याचे साथीदार वैजिनाथ रामा भोसले, सागर  ऊर्फ  सागर्‍या  रुक्‍कम थोरात यांचा सहभाग असल्याचेे निष्पन्‍न झाले होते. त्यांना सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील अधिकारी व  कर्मचारी  यांनी  मोहोळ तालुक्यातील नरखेड फाटा येथे सापळा लावून ताब्यात घेत असताना पोलिसांनी आरोपींचा पाठलाग केला. त्यावेळी मोहोळ येथे छग्या ऊर्फ छगन शिंदे, वैजिनाथ भोसले, सागर थोरात यांनी पोलिसांवर प्राणघातक हल्ला करून एका नागरिकाचा खून केला. त्यावेळी वैजिनाथ भोसले यास पोलिसांनी घटनास्थळीच पकडले, तर इतर दोघे पळून गेले होते. त्यावेळी वैजिनाथ भोसले याने सोड्डी येथील दरोड्याच्या गुन्ह्याची कबुली दिली. 
गुन्हेगारांच्या या टोळीने गंभीर गुन्हे केले आहेत. या टोळीविरुद्ध खुनासह दरोडा, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, चोरी करणे अशाप्रकारचे गुन्हे सोलापूर तालुका, मंद्रुप, कामती, मंगळवेढा, मोहोळ पोलिस ठाण्यात तसेच सोलापूर लोहमार्ग पोलिस ठाण्यात दाखल आहेत. या टोळीविरुद्ध आंध्र प्रदेशातील कर्नुल रेल्वे पोलिस ठाणे, अनंतपूर रेल्वे पोलिस ठाणे, हिंदुपूर रेल्वे पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे या टोळीविरुध्द महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियत्रंण कायदा सन 1999 (मोक्‍का) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

या टोळीविरुध्द मोक्‍का कायद्यांतर्गत कारवाई होण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा, मंगळवेढा पोलिस ठाणे यांच्याकडून प्रस्ताव तयार करुन तो पोलिस अधीक्षक एस. वीरेश प्रभू यांच्या शिफारसीवरुन विशेष पोलिस महानिरीक्षक नांगरे-पाटील यांच्याकडे पाठविण्यात आला होता. विशेष पोलिस महानिरीक्षक नांगरे-पाटील यांनी या प्रस्तावास मंजुरी दिल्याने या गुन्हेगारांविरुध्द कारवाई करण्यात येणार आहे.