होमपेज › Solapur › जि.प.त ‘लाचलुचपत’ची कारवाई

जि.प.त ‘लाचलुचपत’ची कारवाई

Published On: Mar 04 2018 1:38AM | Last Updated: Mar 03 2018 11:03PMसोलापूर : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेमध्ये शनिवारी सायंकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने कारवाई करीत प्रशासन अधिकार्‍यासह दोघांना ताब्यात घेतले. तर तिसर्‍या व्यक्‍तीचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता. बांधकाम विभागातील स्थापत्य अभियंत्याकडूनच 4 लाख रुपयांची मागणी करून 85 हजार रुपये स्वीकारल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागातील अधिकारी चंद्रकांत होळकर आणि बांधकाम विभाग 1 मधील लिपिक विजय माणिकराव कुलकर्णी अशी  ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. तर पळून गेलेला वरिष्ठ लिपिकरत्नाकर लोखंडे याचा शोध सुरू आहे.

यातील तक्रारदार हा जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील स्थापत्य अभियंता असून त्याची वेतनवाढ, फरक देण्यासाठी त्यांनी वरिष्ठांकडे अर्ज केला होता. त्यावेळी बांधकाम विभागातील लिपिक लोखंडे, कुलकर्णी, जि.प. सामान्य प्रशासन अधिकारी होळकर यांनी तक्रारदारांकडे 4 लाख रुपयांची लाच मागितली होती. 

त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यावरून शनिवारी सायंकाळी सापळा लावून लाचेच्या रकमेचा पहिला हप्ता 85 हजार रुपये स्वीकारताना प्रशासन अधिकारी होळकर व लिपिक कुलकर्णी यांना ताब्यात घेण्यात आले, तर लोखंडे फरार झाला आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.