Tue, May 21, 2019 13:15होमपेज › Solapur › सहकारी संस्थांच्या थकबाकीदारांवर दिवाळखोर कायद्यानुसार कारवाई करावी : शेखर चरेगावकर 

सहकारी संस्थांच्या थकबाकीदारांवर दिवाळखोर कायद्यानुसार कारवाई करावी : शेखर चरेगावकर 

Published On: Jun 23 2018 1:23AM | Last Updated: Jun 22 2018 9:04PMसोलापूर : प्रतिनिधी

राज्यातील सहकारी संस्थांच्या थकबाकीदारांंच्या वसुलीसाठी केंद्राच्या दिवाळखोर कायद्यानुसार राज्य शासनाने धोरण आखून प्रभावी वसुली करून जनतेचा पैसा शासनाने वसूल करावा, अशाप्रकारचे धोरण राज्य शासनाने राबवावे, अशी शिफारस राज्य सहकारी परिषदेच्यावतीने करण्यात आल्याची माहिती परिषदेचे अध्यख शेखर चरेगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर हे शुक्रवारी सोलापूर दौर्‍यावर आले असता सकाळी सोलापूर श्रमिक पत्रकार संघात त्यांचा वार्तालाप झाला. त्यावेळी चरेगावकर बोलत होते. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांच्या हस्ते चरेगावकर यांचा सत्कार करण्यात आला. राज्यातील शेतकर्‍यांना सहज व तातडीने कर्जवाटप व्हावे यासाठी राज्य सहकारी बँक व नाबार्ड यांच्या सहकार्याने शासनाने शेतकर्‍यांना थेट कर्ज वाटप करावे, असा अहवाल सहकार परिषदेच्यावतीने राज्य शासनाला देण्यात आला आहे.

या माध्यमातून शेतकर्‍यांना वेळेत व थेट कर्जपुरवठा होईल. त्यायोगे   कर्ज वाटपात  नियमितता येईल. हे  संगणकीकरणामुळे शक्य होण्यासारखे आहे,  असेही  चरेगावकर यांनी सांगितले. सहकार परिषदेने गेल्या तीन वर्षांत राष्ट्रीयीकृत बँकांकडून होणार्‍या शेती कर्ज वाटपावर सुपरवायझर केल्यामुळे शेतकर्‍यांचा कर्जपुरवठा वाढून तो 12 टक्क्यांवरून 48 टक्क्यांपर्यंत गेला.  तसेच ज्या सहकारी संस्था अस्तित्वात आहेत त्यांच्या सक्षमीकरणासाठी सभासदांसाठी संगणक साक्षरता कक्ष उभारण्याबाबत सहकार परिषदेेने सांगितले आहे.

जेणेकरून सहकारी संस्था या यशस्वी होऊ शकतील. सहकारी संस्थेची गरज ही समाजाच्या गरजेप्रमाणे बदलणे गरजेचे असल्यामुळे समाजाच्या गरजेप्रमाणे सहकारी संस्थांची निर्मिती करण्याचे काम सहकार परिषदेेने घेतले आहे. चांगले लोक सहकारात येण्यासाठी सहकारातील रोजगाराच्या संधी समाजापुढे आणून सहकारातील यशस्वीतांच्या यशोगाथा समाजापुढे मांडण्यात येणार आहेत. राज्यात 54 प्रकारच्या सहकारी संस्था आहेत. परंतु त्यांचा एकच कायदा आहे. त्यामुळे सहकाराच्या निवडणुकीत अनेक त्रुटी आहेत. त्यामुळे सहकार कायद्यामध्ये आमुलाग्र बदल करण्याचे काम सुरु आहे. गेल्या तीन वर्षांत राज्यातील 54 हजार बोगस सहकारी संस्था बंद केल्या असल्याचेही चरेगावकर यांनी सांगितले. यावेळी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष दिलीप पतंगे, सहकार भारतीचे दामोदर देशमुख आदी उपस्थित होते.

सोलापूर जिल्ह्यात सध्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती आणि सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील गैरप्रकारांवर कारवाई सुरु आहे. या पार्श्‍वभूमीवर ना. शेखर चरेगावकर यांच्या वक्‍तव्याला महत्त्व आहे. जर का दिवाळखोरी कायद्यांतर्गत कारवाई झाली तर अनेक दिग्गजांची अडचण होणार आहे.

स्व. यशवंतराव चव्हाण यांचे नाव घेऊन अनेक पक्ष राजकीय पोळी भाजतात...

माजी मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांचे नाव घेऊन राज्यात अनेक पक्ष आपली राजकीय पोळी भाजतात. त्यांच्या विचारांचे खर्‍याअर्थाने आचरण केले असते तर राज्य बँकेवर जे निर्बंध लावण्याची जी कारवाई करावी लागली ती नामुष्कीची वेळ आली नसती. राज्यातील जिल्हा बँकांची स्थिती पाहिली तर त्यामध्ये जे कर्ज घेणारे आहेत तेच लोक आज राज्य शासन सहकार चळवळ मोडीत काढत असल्याच्या वल्गना करीत आहेत. प्रत्यक्षात कर्जे पाहिली तर ती काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे व त्यांच्या सहकारी संस्थांकडेच आहेत. त्यामुळे जिल्हा बँकांची आर्थिक स्थिती डबघाईला आलेली आहे. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्जदारांची यादी पाहिली तर हे आपोआपच सिध्द होईल, असेही शेखर चरेगावकर यांनी सांगितले.