होमपेज › Solapur › नशिले शीतपेय तयार करणार्‍या दोन कारखान्यांवर कारवाई

नशिले शीतपेय तयार करणार्‍या दोन कारखान्यांवर कारवाई

Published On: Feb 06 2018 10:57PM | Last Updated: Feb 06 2018 10:53PMसोलापूर : प्रतिनिधी

नशिले शीतपेय तयार करणार्‍या शहरातील ‘ओमसाई’ आणि ‘साई समर्थ’ या दोन कारखान्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने कारवाई  करण्यात  येऊन दोन्ही कारखाने सील करण्यात आले. याप्रकरणी पाच जणांना अटक करून सुमारे दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

राजू लछमय्या कोकोंडा (वय 49, रा. श्रमजीवी निलमनगर, सोलापूर), राजशेखर रामचंद्र होनराव (50, रा. कुंभारी), विजयकुमार अंबादास दिकोंडा (46, रा. स्वागतनगर, सोलापूर), रतन अंबाजी नांदर्गी (41, रा. श्रमजिवी निलमनगर, सोलापूर), लाडलेसाब आबुसाब कलवल ( 65, रा. सरवदेनगर, सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

ओमसाई व साई समर्थ ड्रिंक्स नावाचे शीतपेय पिल्यानंतर नशा होत असल्याच्या तक्रारी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे आल्यानंतर यक विभागाच्यावतीने 2 ऑगस्ट 2017 रोजी हे शीतपेय कशाप्रकारे तयार केले जाते, याची चाचणी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांसमोर कार्यालयात घेतली होती. त्यावेळी या शीतपेयामध्ये प्रमाणापेक्षा जास्त अल्कोहोल तयार होऊन त्याद्वारे नशा होत असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे हे शीतपेय मानवी शरीरास अपायकारक आहे का नाही, याची तपासणी करण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. त्याबाबतचा अहवाल मिळाल्यानंतर हे दोन्ही शीतपेय तयार करणार्‍या कारखान्यांच्या मालकांना 1 सप्टेंबर 2017 रोजी शीतपेय तयार न करण्याबाबत नोटिसा देऊन कारखाने बंद करण्याबाबत कळविण्यात आले होते.

परंतु, हे दोन्ही कारखाने सुरूच असल्याच्या तक्रारी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे आल्या होत्या. त्यामुळे या विभागाकडून श्रमजिवी निलम नगरातील ओमसाई ड्रिंक्स आणि मुळेगाव रोडवरील सरवदे नगरातील साई समर्थ ड्रिंक्स या कारखान्यांवर छापा मारला. त्यावेळी ओमसाई ड्रिंक्स कारखान्यात राजू कोकोंडा, राजशेखर होनराव, विजयकुमार दिकोंडा, रतन नांदर्गी हे शीतपेय तयार करताना मिळून आले, तर साई समर्थ ड्रिंक्स कारखान्यात लाडलेसाब कलवल हा मिळून आला. यावेळी राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने कारखान्यात तयार करण्यात आलेले नशिले शीतपेय, मशीन असे साहित्य जप्त करून कारखाना सील केला. याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून सध्या चौघेही न्यायालयीन कोठडीत आहेत.

ही कारवाई अधीक्षक रविंद्र आवळे, निरीक्षक समीर पाटील, दुय्यम निरीक्षक प्रशांत निकाळजे, सी. के. वाघमारे, संजय बोधे, जवान योगीराज तोग्गी, गजानन होळकर, विजय शेळके, कपिल स्वामी, आनंद जोशी, रशिद   शेख,  संजय  नवले  यांनी  केली.