होमपेज › Solapur › भेसळयुक्‍त डांबराच्या तीन टँकरवर कारवाई

भेसळयुक्‍त डांबराच्या तीन टँकरवर कारवाई

Published On: Jan 02 2018 1:17AM | Last Updated: Jan 01 2018 11:21PM

बुकमार्क करा
सोलापूर : प्रतिनिधी

राज्यातील रस्त्यांच्या कामांमध्ये वापरण्यात येणारे भेसळयुक्‍त डांबर घेऊन जाणारे तीन टँकर गुन्हे शाखा आणि दहशतवादविरोधी पथकाच्या वतीने पकडून सहा जणांना अटक करून सुमारे 50 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत शहर पोलिसांनी टेंभुर्णी येथील भेसळयुक्‍त डांबराचा कारखाना सील केला आहे.

हुसेन महमद शेख (वय 29, रा. चेंबूर एमएमआरडीए कॉलनी, वाशी नाका, मुंबई), मनोजकुमार राजन चतुर्वेदी (27, रा. उत्तर प्रदेश), रामधिरज श्रीराम वर्मा (19, रा.  उत्तर प्रदेश), गोविंद विदेशी सरोज (38, उत्तर प्रदेश), जहाँगीर म. शिराजूम आलम (वय 39, चौघे रा. उत्तर प्रदेश), उ. बिरबल मोरया (वय 41, उत्तर प्रदेश, सध्या रा. वाहेगुरी ढाबा,  टेंभुर्णी, ता. माढा, जि. सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत दहशतवाद विरोधी पथकातील पोलिस नाईक प्रीतमसिंह किसनसिंह  गोरलीवाले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सलगर वस्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या सहा जणांना सोमवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायदंडाधिकारी देशमुख यांनी 4 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

रस्त्यांच्या कामांमध्ये   भेसळयुक्‍त  डांबर वापरण्यात येत असल्याची माहिती दहशतवादविरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार दहशतवाद विरोधी   पथक आणि शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शनिवारी सकाळी सोलापूर-मंगळवेढा रस्त्यावरील बीएमआयटी कॉलेजजवळ एमएच 04 एचडी 8280, एमएच 04 एफयू 4950 आणि   एमएच 04 एचडी 8268 हे टँकर पकडून त्यातील डांबराची चौकशी केली. त्यावेळी टँकरमधील डांबर हे शासकीय  कामासाठी   वापरण्यात  येणार असल्याचे समजले. तसेच टँकरमधील ओरिजनल डांबर काढून घेऊन त्यामध्ये ग्रॅन्डरच्या मदतीने रांगोळीसारखी पावडर मिसळून  ते  भेसळयुक्‍त  डांबर टँकरमध्ये  भरून  घेऊन  जात  असल्याचे  उघड झाले. त्यामुळे पोलिसांनी तीनही टँकरचे चालक व क्‍लिनर यांना ताब्यात घेऊन हे भेसळयुक्‍त डांबर कोठून आणले याबाबत चौकशी केली.

हे भेसळयुक्‍त डांबर टेंभुर्णी येथील लोंढे वस्ती येथे असलेल्या डांबराच्या कारखान्यातून आणल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी हा कारखाना सील केला. याबाबत सलगर वस्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तीनही टँकर, डांबर असा मिळून सुमारे 50 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक बाळासाहेब शिंदे तपास करीत आहेत.