Thu, Jun 27, 2019 18:05होमपेज › Solapur › वाळू तस्करांवर कारवाई

वाळू तस्करांवर कारवाई

Published On: Mar 14 2018 12:48AM | Last Updated: Mar 13 2018 10:53PMपंढरपूर : प्रतिनिधी 

भीमा नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा करणार्‍या 12 होड्या मंगळवारी तहसीलदार मधुसूदन बर्गे यांच्या नेतृत्वाखाली महसूल प्रशासनाने जेसीबीच्या साहाय्याने नष्ट केल्या आहेत. इसबावी येथे 8, तर भटुंबरे येथे 4 अवैध वाळू वाहतूक करणार्‍या होड्या नष्ट केल्याने वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहे. 

उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांच्या आदेशानुसार तहसीलदार मधुसुदन बर्गे यांनी मंडलाधिकारी, तलाठी आदी कर्मचार्‍यांना बरोबर घेऊन भीमा नदीपात्रात इसबावी व भटुंबरे (ता.पंढरपूर) येथे सकाळी 10 वाजता धडक कारवाई केली. इसबावी येथे भीमा नदीपात्रात भटुंबरे हद्दीतून गोण्यात वाळू भरून होडीच्या साहाय्याने इसबावीकडे आणली जात होती. या ठिकाणी तहसीलदार मधुसूदन बर्गे यांचे पथक दाखल होताच, वाळू वाहतूक करणारे लोक होड्या जागेवर सोडून पळून गेले. वाळूने भरलेल्या होड्या ताब्यात घेऊन महसूल प्रशासनाने वाळू नदीपात्रात टाकून 8 होड्या जागेवरच जेसीबीच्या साहाय्याने तोडून टाकल्या, तर भटुंबरे येथे पाण्यातून वाळू वाहतूक करणार्‍या 4 होड्या ताब्यात घेऊन नष्ट केल्या. या धडक कारवाईत तहसीलदार बर्गे, पंढरपूर मंडल अधिकारी एस. ए. मुजावर व तलाठी, चळेचे मंडलाधिकारी नीलेश भडंगे व तलाठी, पटवर्धन कुरोलीचे मंडल अधिकारी बाळासाहेब औसेकर व तलाठी यांनी कारवाईत सहभाग घेतला. या धडक कारवाईमुळे अवैध वाळू उपसा करणार्‍या वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे.