होमपेज › Solapur › व्यापारी गाळ्यांचे कर्ज न  भरणारे सरपंच अपात्र होणार ग्रामसेवकांवरही कारवाई : पाटील 

व्यापारी गाळ्यांचे कर्ज न  भरणारे सरपंच अपात्र होणार ग्रामसेवकांवरही कारवाई : पाटील 

Published On: Jan 22 2018 1:22AM | Last Updated: Jan 21 2018 10:14PMसोलापूर : प्रतिनिधी

जिल्हा परिषद ग्राम विकास निधीतून विविध ग्रामपंचायतींना व्यापारी गाळे बांधकामासाठी कर्ज देण्यात आले होते. यापैकी काही ग्रामपंचायतींनी कर्जाची रक्‍कम न भरल्याने या ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंचाचे पद अपात्र का ठरवू नये, अशी नोटीस देण्यात आली असून ग्रामसेवकांवरही प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती जि.प. ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांनी दिली. माळशिरस ग्रामपंचायतीकडे 3 लाख 26 हजार कर्ज थकीत आहे. मात्र या ग्रामपंचायतीचे नगरपालिकेत समाविष्ट झाल्याने नगरपालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना थकीत रक्क्म भरण्यास सांगण्यात आले आहे. बोरगाव ग्रामपंचायतीकडे 6 लाख 14 हजार रुपयांचे थकीत कर्ज असून याप्रकरणी सरपंचाविरुध्द पद अपात्र ठरविण्याची नोटीस देण्यात आली आहे. करमाळा तालुक्यातील जेऊर ग्रामपंचायतीकडे 67 हजार रुपयांची थकबाकी असल्याने, दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद ग्रामपंचायतीकडे 2 लाखांची थकबाकी असल्याने, सांगोला तालुक्यातील खवासपूर ग्रामपंचायतीकडे 80 हजारांची थकबाकी असल्याने या सर्व ग्रामपंचायतींच्या सरपंचांचे पद अपात्र ठरविण्याची कारवाई जिल्हा परिषदेकडून करण्यात येत आहे. या ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांवरही प्रशासकीय कारवाई करण्यात येत असल्याने थकीत ग्रामपंचायतीच्या सरपंच व ग्रामसेवकांत खळबळ उडाली आहे.