मोहोळ : वार्ताहर
देवदर्शनासाठी चाललेल्या दुचाकीला भरधाव वेगात आलेल्या कंटेनरने पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. मात्र उपचारापुर्वी त्याचा मृत्यू झाला. आनंद उत्तम थोरात (वय १९ रा.देवडी तालुका मोहोळ) असे मृत दुचाकीस्वारांचे नाव आहे. हा अपघात २० ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता सोलापूर-पुणे महामार्गावर देवडी गावच्या शिवारात घडला.
गेल्या काही दिवसांपासून सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग दुरुस्तीचे काम सुरु आहे. त्यामुळे दंडवाट वस्ती ते देवडी दरम्यानची वाहतुक एका बाजूने सुरु आहे. २० ऑगस्ट रोजी आनंद उत्तम थोरात हा युवक महामार्गा वरुन देवडी पाटी मार्गे दुचाकी क्र. एम.एच.१३ ए.ई.५०७४ ने महादेवाच्या दर्शनासाठी पापरी या ठिकाणी चालला होता. दुपारी १ वाजता त्यांची दुचाकी देवडी पाटी येथील हॉटेल तुळजाभवानी येथे आली होती.
यावेळी सोलापूर ते पुण्याच्या दिशेने भरधाव वेगात आलेला कन्टेनर क्र. एच.आर.६१.डी.१३९९ ने त्याच्या दुचाकीला जोराची धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यामधे तो गंभीर जखमी झाल्याने स्थानिक नागरिकांनी त्यास तात्काळ उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
मोहोळ पोलीसात कंटेनर चालक दलवीर इमराज सिंग (रा. प्लाही.ता. बशोली, कठुवा जम्मू काश्मीर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.