Sat, Mar 23, 2019 01:57होमपेज › Solapur › ‘शिवशाही’चा अपघातीच प्रवास

‘शिवशाही’चा अपघातीच प्रवास

Published On: Sep 01 2018 1:48AM | Last Updated: Aug 31 2018 10:24PMसोलापूर : इरफान शेख

राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) ताफ्यात मोठ्या दिमाखात दाखल झालेली वातानुकूलित शिवशाही बस ही तिच्या सुविधांपेक्षा अपघातांनीच जास्त चर्चेत आली आहे. गेल्या वर्षभरात दाखल झालेल्या भाडेतत्त्वावरील व स्वत: मालकीच्या शिवशाही बसचे तब्बल 230 अपघात झाले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यात 19 प्राणांतिक, तर 190 हे गंभीर अपघात घडलेले आहेत. सोलापुरात गुरुवारी सायंकाळी शिवशाही बसला किरकोळ अपघाताला सामोरे जावे लागले आहे. विशेष बाब म्हणजे भाडेतत्त्वावरील बसेसच्या अपघातांची संख्या अधिक आहे.

शिवशाही बसचे अपघात रोखण्यासाठी सध्या एस.टी. महामंडळाकडून अतोनात प्रयत्न सुरू आहेत. बसवरील कार्यरत चालकांना पुन्हा प्रशिक्षण देणे तसेच भाडेतत्त्वावरील शिवशाही बस पुरवणार्‍या कंत्राटदारांनी परतीच्या प्रवासात नवीन चालक देण्याची सूचना केली गेली आहे. नियम न पाळणार्‍या कंत्राटदारांना कारवाईस सामोरे जावे लागेल, असा इशारादेखील महामंडळाने दिला आहे. खासगी प्रवासी बस वाहतूकदारांनी निर्माण केलेली स्पर्धा पाहता एसटी महामंडळाने वर्षभरापूर्वी वातानुकूलित शिवशाही बस आपल्या ताफ्यात दाखल करण्याचा निर्णय घेतला होता. अजून दोन हजार वातानुकूलित बसेस खरेदी करण्याचे नियोजन असून यामध्ये 1,500 भाडेतत्त्वावर आणि 500 बसेस महामंडळाच्या स्वत:च्या मालकीच्या आहेत. सध्या 976 वातानुकूलित बसगाड्या ताफ्यात असून यातील 494 बसेस स्वत:च्या मालकीच्या आहेत. वातानुकूलित असलेल्या या गाड्यांची राज्यभरात सेवा सुरू आहे. मात्र त्यांच्या सेवेपेक्षा या गाड्यांच्या होणार्‍या अपघातांचीच अधिक चर्चा आहे. गेल्या वर्षभरात शिवशाही बस गाड्यांचे अपघात सत्र वाढलेले असून 230 अपघात झाल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली. यामध्ये 19 प्राणांतिक अपघात असून 190 हे गंभीर अपघात, तर 21 किरकोळ अपघात असल्याचे सांगण्यात आले. महामंडळाने या बसवर कार्यरत चालकांना पुन्हा प्रशिक्षण देण्याचे कामही टप्प्याटप्प्यात सुरू केले होते. हे प्रशिक्षण जवळपास पूर्ण झाले आहे. भाडेतत्त्वावरील शिवशाही बसवर कार्यरत चालकांनादेेखील प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती एसटी महामंडळाच्या अधिकार्‍यांनी दिली.

अन्यथा कंत्राटदारांवर कारवाईचा बडगा
राज्यात भाडेतत्त्वावर शिवशाही बसेस चालविणारे सात कंत्राटदार आहेत. लांबपल्ल्यांच्या एका फेरीनंतर पुन्हा परतीच्या मार्गावर नवीन चालक देण्याची सूचना एसटी महामंडळानेच कंत्राटदारांना केली आहे. मात्र त्याची अंमलबजावणी काहीजणांकडून केली जात नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे अशा कंत्राटदार व चालकांवर कारवाईचा इशारा महामंडळाने दिला आहे. महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, वर्षभरात शिवशाही बस गाड्यांचे अपघात जास्तच झाले आहेत, हे खरे आहे. हे अपघात रोखण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून चालकांना प्रशिक्षण दिले जात आहे. तसेच परतीच्या प्रवासात नवीन चालक न देणार्‍या कंत्राटदारांवर कारवाईदेखील केली जाणार आहे.   

सोलापूर विभागातून 19 फेर्‍या
स्पर्धेच्या युगात प्रवाशांना वातानुकूलित सेवा मिळावी यादृष्टीने एस.टी. महामंडळाकडून शिवशाही बसेस सुरू करण्यात आल्या. सोलापूर विभागातून विविध शहरांना जोडण्यासाठी शिवशाहीच्या 19 फेर्‍या केल्या जात आहेत. राज्यात 976 वातानुकूलित शिवशाही धावत आहेत; परंतु या शिवशाहीला गेल्या वर्षभरापासून 230 अपघातांचा समाना करावा लागला आहे.