Fri, Jul 19, 2019 15:48होमपेज › Solapur › महापौरांच्या खुर्चीची आरती 

महापौरांच्या खुर्चीची आरती 

Published On: Aug 31 2018 1:43AM | Last Updated: Aug 30 2018 10:50PMसोलापूर : प्रतिनिधी 

आपल्या कक्षात महापौर उपस्थित असतानाही गुरुवारची महापालिकेची सर्वसाधारण सभा तब्बल दीड तास उशिराने सुरू झाल्यामुळे संतप्त झालेल्या नगरसेविकांनी महापौरांच्या खुर्चीची आरती ओवाळली. एलईडीच्या विषयावरून टक्केवारीच्या  वाटाघाटी झाल्या असतील, तर सभागृहात या आणि सभा सुरू करा, असा संतप्त सवालदेखील नगरसेविकांनी सभागृहातच माईकवरून उपस्थित केला.

पालिकेची 8 ऑगस्ट 18 ची तहकूब सभा गुरुवार, 30 ऑगस्ट रोजी महाापैर शोभा बनशेट्टी यांच्या उपस्थितीत पार पडली. दुपारी चार वाजता होणारी सभा तब्बल दीड तास उशिराने साडेपाच वाजता सुरू झाली. महापौर आपल्या कक्षात होत्या. पक्षनेता, विरोधी पक्ष शिवसेनेसह सर्वच विरोधी पक्षांचे गटनेते महापौरांच्या कक्षेत चर्चा करीत होते. दरम्यान, काँग्रेस, माकप, एमआयएमच्या नगरसेविकांनी सभेला उशीर होत असल्याने संताप व्यक्‍त करीत महापौरांच्या नावाने घोषणा सुरू केल्या. नगरसचिवदेखील यावेळी सभागृहात उपस्थित नव्हते. त्यामुळे नगरसेवक आणखीनच संतप्त झाले.

चतुर्थीचा उपवास तर आहेच; परंतु वॉर्डात एकही विकासाचे काम होत नसल्यामुळे नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते आहे. महापौर नेहमीच सभा सुरू करण्यास उशीर करतात, असा सूर काँग्रेस नगरसेविका श्रीदेवी फुलारी, फिरदोस पटेल, ज्योती करगुळे, कामिनी आडम, शेख आदी नरगसेविकांनी महापौरांच्या नावानी घोषणा देण्यास सुरुवात केली. यावेळी सेना व काँग्रेस नगरसेवकांनीही नगरसेविकांच्या सुरात सूर मिसळला. 

महापौरांना आणण्यासाठी सर्वच नगरसेविका सभागृहातून बाहेर पडल्या. आरतीचे ताट घेऊन महापौरांच्या खुर्चीला ओवाळले. हा गोंधळ समजताच महापौर शोभा बनशेट्टी सभागृहात दाखल होण्यास निघाल्या. 

त्यावेळी नगरसेविकांनी त्यांनाही सभागृहाच्या प्रवेशद्वारात अडवून ओवाळण्याचा प्रयत्न केला. नगरसेविकांनी संताप व्यक्‍त केल्यामुळे अखेरीस साडेपाच वाजता सभेचे कामकाज सुरू झाले.