Tue, May 21, 2019 04:26होमपेज › Solapur › सुरेश हसापुरेंचा राजकीय गेम, तर पवार बंधूंचा वरू रोखला!

सुरेश हसापुरेंचा राजकीय गेम, तर पवार बंधूंचा वरू रोखला!

Published On: Jul 05 2018 1:41AM | Last Updated: Jul 04 2018 8:44PMसोलापूर : महेश पांढरे 

नुकत्याच पार पडलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना-पालकमंत्री आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी या निवडणुकीत माजी आमदार दिलीप माने हे या निवडणुकीत  किंगमेकर ठरले आहेत. सहकारमंत्री सुभाष देशमुखांचे खंदे समर्थक इंद्रजित पवार यांचा पराभव सहकारमंत्र्यांच्या जिव्हारी लागणारा आहे. तर काँग्रेस आघाडीतील प्रमुख उमेदवार सुरेश हसापुरे यांचा पराभव म्हणजे त्यांचा राजकीय गेम झाल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

दिलीप  माने    यांनी  सुरुवातीपासूनच बाजार समितीच्या निवडणुकीची मोठी व्युहरचना केली होती. त्यामुळे अनेक गणांतील उमेदवारीसंदर्भात कोणासाठीही अट्टाहास न धरता ज्या लोकांची मदत आवश्यक आहे  त्या लोकांना सोबत घेऊन त्यांनी अनेकांचा राजकीय डाव उधळून लावला आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डीचे पवार बंधू सध्या जिल्ह्याच्या राजकारणात चांगलेच सक्रिय होऊ पाहात होते. मार्डी ग्रामपंचायतीपासून ते उत्तर सोलापूर तालुका पंचायत समितीपर्यंत त्यांनी एकतर्फी मजल मारली होती. उत्तर सोलापूर तालुक्यातील काही गावांत त्यांनी चांगले बस्तान बसविण्यास सुरुवात केली होती. गतवेळच्या पंचायत समिती निवडणुकीत पवार यांनी राष्ट्रवादीचे नेते बळीरामकाका साठे यांना हाताशी धरुन दिलीप माने यांच्या हातात असणारी पंचायत समिती काढून घेतली होती. याचे शल्य माजी आ. माने यांच्या मनात होते. त्यांनी तोच गेम फिरवित काका साठे यांनाच हाताशी धरुन त्यांनी पवार बंधूंच्या विजयाचा वारु नान्नज गणातच रोखून धरला आणि पंचायत समितीमध्ये झालेल्या पराभवाची परतफेड केली. 

दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये कंदलगाव गणात सुरेश हसापुरे यांचा राजकीय गेम झाला असून त्याठिकाणी  हसापुरे यांचे एकेकाळचे विश्‍वासू आणि गुंजेगावचे सरपंच संतोष पवार यांच्या नाराजीचा फटका हसापुरेंना बसला आहे. सुरुवातीला संतोष पवार यांना उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र ऐनवेळी त्यांना माघार घेण्यास सांगण्यात आले. त्यामुळे त्यांच्या मनात नाराजी कायम होती.  ऐनवेळी पूर्वी  दिलीप माने यांच्यासोबतच असणारे आप्पासाहेब पाटील यांना आपल्या गोटात ओढून त्यांना उमेदवारी देण्यात सहकारमंत्री सुभाष देशमुख यशस्वी झाले. त्यामुळे आप्पासाहेब पाटील यांची उमेदवारी आणि संतोष पवार यांची नाराजी सुरेश हसापुरेंच्या पथ्यावर पडली. त्यामुळे त्यांना या गणात निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले, हे सत्य आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील सहाही जागांवर  माने यांनी यशस्वी व्युहरचना करत दोन गण बळीरामकाका साठे यांच्याकडे सोपविले. त्यामुळे साठे यांनी कळमण गणात सुपुत्र जितेंद्र साठे आणि नान्‍नज गणातून प्रकाश चोरेकर यांची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. 

पाकणी गणात ऐनवेळी प्रकाश वानकर यांना उमेदवारी देऊन माने यांनी आणखी एक खेळी केली. या गणात राष्ट्रवादी आणि शिवसेनेची ताकद लक्षात घेत त्यांनी प्रकाश वानकर यांना या गणातून लढण्याची गळ घातली. त्यामुळे वानकर यांनी पूर्ण ताकदीनीशी ही जागा जिंकून आणली. हिरज गणात स्वत: दिलीप माने यांनी एकतर्फी विजय मिळविला. दस्तुरखुद्द  मार्डी गणातून नामदेव गवळी यांना निवडून आणून माने यांनी उत्तर तालुक्यातील आपली ताकद अबाधित असल्याचे पुन्हा एकदा सिध्द करुन दाखविले.