Thu, Feb 21, 2019 05:53होमपेज › Solapur › कारभार सुधारा अन्यथा राजीनामा : नगरसेवक खरादी

कारभार सुधारा अन्यथा राजीनामा : नगरसेवक खरादी

Published On: Feb 15 2018 10:31PM | Last Updated: Feb 15 2018 8:49PMसोलापूर ः प्रतिनिधी

मार्च अखेरपर्यंत सोलापूर महानगरपालिकेच्या कारभारात सुधारणा न झाल्यास राजीनामा देणार असल्याची माहिती नगरसेवक रियाज खरादी यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितली. गेल्या फेबु्रवारी 2017 मध्ये रियाज खरादी यांनी एआयएमआयएम पक्षाकडून प्रभाग क्रमांक 14 मधून निवडणूक जिंकली होती.

सोलापूर महानगरपालिकेच्या जवळपास वर्षभराच्या कारभारात 12 सर्वसाधारण सभा झाल्या.त्यामधील 9 सभा तहकूब झाल्या.त्यामधील  एक-दोन सभा गोंधळात पार पडल्या. मनपाकडून कोणत्याही प्रकारचा विकास निधी मिळालेला नाही. प्रभागातील नागरिकांना दिलेली आश्‍वासने पूर्ण करण्यात अपयश येत आहे. याच्या निषेधार्थ मार्च अखेरपर्यंत झोन समित्या स्थापन न झाल्यास 1 एप्रिलला नगरसेवक पदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती रियाज खरादी यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी बोलताना सांगितली. ही फक्त घोषणा नसून प्रत्यक्ष कृती करणार आहे, असेही  नगरसेवक खरादी यांनी आवाहन केले आहे.

सोलापूर मनपातील सत्ताधार्‍यांचा वाद मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊन पोहोचला असून त्यांनी कानपिचक्या दिल्या तरी  कारभारात सुधारणा होत नाही.नागरिकांच्या समोर तोंडघशी पडण्याऐवजी मार्चनंतर नगरसेवक पदाचा राजीनामा देऊन सोलापूरच्या विकासासाठी जनआंदोलन उभे करु, असेही रियाज खरादी यांनी आश्‍वासन दिले आहे.

गुरुवारी झालेल्या या पत्रकार परिषदेस रियाज खरादी, रमीज खरादी, मुबीन फडणीस, शाहीद खरादी, अकबर कुरेशी, अरबाज खरादी आदी उपस्थित होते.

एमआयएम पक्षाचा एकही नगरसेवक सोबत नव्हता

विकास कामे होत नाहीत व पर्याप्त निधी प्राप्त होत नसल्याच्या विरोधात प्रभाग क्रमांक 14 चे नगरसेवक रियाज खरादी हे राजीनामा देणार असल्याची माहिती दिली. परंतु एमआयएमचा एकसुद्धा नगरसेवक सोबत नव्हता. शहरात एमआयएमचे एकूण 10 नगरसेवक आहेत. तरीदेखील रियाज खरादी हे पत्रकार परिषदेस एकटेच आले होते.