सोलापूर : प्रतिनिधी
बीबीएच्या दुसर्या सत्राची फेरपरीक्षा रद्द करावी या मागणीसाठी अभाविप संघटनेतर्फे आज विद्यापीठात आंदोलन करण्यात आले. बीबीए दुसर्या सत्राची परीक्षा 19 एप्रिल 2018 रोजी झाली. यामध्ये हिराचंद नेमचंद महाविद्यालयात सराव परीक्षेदरम्यान एका प्राध्यापकाच्या चुकीमुळे विद्यार्थ्यांना विद्यापीठाचाच पेपर दिला गेला. यामुळे विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याचे सांगत काही संघटनांनी दोषींवर कारवाई आणि फेरपरीक्षा घेण्याचे निवेदन विद्यापीठास दिले. यावर सोलापूर विद्यापीठाने फेरपरीक्षा घेणार असल्याचे सांगितले. यामध्ये बीबीए इंटरनॅशनल बिझनेसची 14 मे आणि बीबीए ऑर्गनायझेशन बिहेविअरची परीक्षा 16 मे 2018 रोजी घेणार असल्याचे जाहीर केले.
मात्र सध्या यामध्ये पूर्वी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाचा पूर्वीचा पेपर दिला असला तरी त्यांना याबाबतीत कुठलीही कल्पना नव्हती. यात विद्यार्थ्यांची काही चूक नाही. त्यामुळे सोलापूर विद्यापीठाने फेरपरीक्षा घेऊ नये यासाठी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर 8 मे रोजी दुपारी 12 वाजता अभाविप संघटनेतर्फे आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे जिल्हा संयोजक यतिराज होनमाने, प्रशांत कुलकर्णी, निखीलेश्वर निल, राघवेंद्र घनाते, अक्षय इनामदार आदी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.