Mon, Aug 19, 2019 00:41होमपेज › Solapur › औराद येथील वाडा देतोय वास्तूकलेची साक्ष

औराद येथील वाडा देतोय वास्तूकलेची साक्ष

Published On: Jan 28 2018 1:32AM | Last Updated: Jan 27 2018 11:27PMहोटगी ः संजीव इंगळे

42 दरवाजे, सहा उंबरे आणि चारही दिशेला चार स्वयंपाकगृहे असलेला चिरेबंदी वाडा आपण कधी पाहिला आहे का? निश्‍चितच प्रत्येकजण कुठे आपण पाहिलो आहोत का या विचारात पडले असणार. बहुदा याचे उत्तर नाही असेच येते. पण हा सुंदर वास्तूकलेचा नमुना दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद येथे आहे. 

तब्बल दीड एकरात वसलेला चिरेबंदी वाडा आजही सुस्थितीत उभा आहे.  हा वाडा कृणप्पा पाटील आणि बापूराव पाटील यांनी 1923 साली बांधण्यास सुरूवात केली. 1926 साली या वाड्याचे बांधकाम पूर्ण झाले असल्याचे याच गावातील जाणकार आप्पासाहेब बिराजदार यांनी सांगितले.

वास्तूकलेचा उत्तम नमुना    

वाड्याचे मुख्य प्रवेशव्दार उत्तर दिशेला आहे. समोरच्या बाजूस दोन मोठ्या खिडक्या आहेत. किल्ल्याच्या नकाशाप्रमाणे वाड्याच्या चारही बाजूला चार स्वयंपाकगृहे आहेत. या चारही स्वयंपाकगृहाची रचना एकसारखी आहे. आज अत्याधुनिक स्वयंपाकगृहात ज्या सुविधा असतात त्या सर्व गोष्टींचा अंतर्भाव या स्वयंपाकगृहात आहेत. या चारही स्वयंपाकगृहांची उंची वाड्याच्या उंचीपेक्षा थोडी जास्त आहे. त्यामुळे या वाड्याला वेगळा लूक देण्याचा प्रयत्न वास्तू उभारणार्‍यांनी केला आहे. दक्षिण बाजूस याचा पाठीमागचा दरवाजा आहे. दोन्ही दरवाजे ओलांडून वाड्यात येताना तीन उंबरे ओलांडावे लागतात. मुख्य प्रवेशव्दाराच्या पूर्वेस आणि पश्‍चिमेस ढेलजं आहेत. मुख्य प्रवेशव्दाराच्या दोन उंबर्‍यांच्या स्पेसमध्ये भिंतीतून वाड्यावर चढण्यासाठी पूर्व आणि पश्‍चिम दिशेला दगडी पायर्‍यांचे जिने बांधलेले आहेत.

दगडी बांधकामामुळे उच्च दर्जा

वाड्याच्या मधोमध घोडे, बैल तत्सम प्राणी बांधण्यासाठी दगडांना जागा आहे. त्यांना पाणी पिण्यासाठी दगडी भांडेदेखील आहे. याचठिकाणी चारही बाजूंनी चढण्या आणि उतरण्यासाठी पायर्‍यांची सुंदर रचना केली आहे. वाड्यातच 100 पोती धान्य बसेल या क्षमतेची दोन पेव आहेत. वाड्यातील खोल्यांमध्ये जुन्या गोटी जशा मातीच्या भांड्याच्या उतरंड्या, वायूविजन आणि प्रकाश रचनेसाठी सोडलेल्या बोळकांड्या, देवळ्या, इंधन ठेवण्याची जागा, भांडी ठेवण्याची आणि धुण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था सार्‍या गोटी दगडी बांधकामामध्येच पाहावयास मिळतात. या वाड्याचा एकही दगड कुठे हललेला दिसत नसल्याचे शिवानंद व्हरशेट्टी यांनी सांगितले.

या वाड्यातील 42 दरवाजांची खासियत म्हणजे प्रत्येक दरवाजाचा आवाज वेगवेगळा येतो. एखाद्या व्यक्‍तीने कोणताही दरवाजा उघडला किंवा झापला त्याच्या आवाजावरून आपण अचूक सांगू शकतो की कोणता दरवाजा उघडला आहे, असे पाटील घराण्याच्या स्नुषा ज्योती पाटील यांनी सांगितले.  

वाड्यात होतात विवाह सोहळे

गावातील अनेक विवाहदेखील याच वाड्यात पार पाडले जातात. हा वाडा म्हणजे सुंदर वास्तूकलेचा नमुना असून दक्षिण तालुक्यात अशा पध्दतीचा वाडा नाही. ऐतिहासिक वास्तू म्हणून याचे संवर्धन करण्यासाठी गरज असल्याचे गांवचे सरपंच प्रमोद शिंदे यांनी  सांगितले. हा वाडा म्हणजे सुंदर वास्तूकलेचा नमुना तर आहेच, पण जो कोणी हा वाडा पाहिला त्याला या वाड्याची भुरळ पडल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र निश्‍चित.