Tue, Apr 23, 2019 10:23होमपेज › Solapur › वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पंढरीत विशेष मोहीम

वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पंढरीत विशेष मोहीम

Published On: Apr 11 2018 1:32AM | Last Updated: Apr 10 2018 8:35PMपंढरपूर : प्रतिनिधी

शहरात सुरू असलेल्या अवैध वाहतुकीला चाप बसविण्यासाठी वाहतूक शाखेच्यावतीने विशेष मोहीम राबवण्यात आली आहे. यात विना परवाना वाहन चालविणे, विना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर, ट्रिपल सीट, दारू पिऊन वाहन चालविणार्‍या 1406 वाहधारकांवर कारवाई करीत 3 लाख 20 हजार 600 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

शहरात गेल्या पाच दिवसांपासून वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीचे नियम मोडणार्‍या वाहनधारकांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. याकरिता जिल्हा पोलिस अधीक्षक एस.विरेश प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा वाहतूक शाखेचे पोलिस पथक तैनात करण्यात आले आहे. या पथकाने पाच दिवसांत 507 केसेस करीत 1 लाख 9 हजार 600 रुपयांचा दंड वसूल केला आहे.  त्याचबरोबर महिला सुरक्षा विषयक पथकही काम पाहत आहे. यामुळे दुचाकी अथवा इतर कोणत्याही वाहनाची तपासणी करण्यात येते. महिला दुचाकीस्वाराची वाहतूक शाखेच्या महिला पोलिसांकडून लायसन तपासणी केली जात आहे. ज्यांच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना आहे. अशा वाहनधारकांना तपासणी करून सोडून देण्यात येते मात्र ज्यांच्याकडे वाहन परवाना नाही. अशा वाहनचालकावर दंडात्मक कारवाई केली जात आहे. त्याचबरोबर विना नंबर प्लेट वाहन चालवणे, दारू पिऊन वाहन चालवणे, फॅन्सी नंबर प्लेट वाहनधारकावर दंडात्मक कारवाई केली जात आहे. पथकातले सर्वजण एका ठिकाणी थांबून कारवाई करतात. त्यामूळे एका वेळेस जास्त वाहने आली तरी त्यांची तपासणी त्वरित करता येते. 

नियम मोडणार्‍या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करताना जर वाहनधारकाने अरेरावी केली तर त्याच्यावर गुन्हा दाखल केला जात आहे. शहर वाहतूक शाखेचे सारंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात महत्वाच्या  रस्त्यावर वेगवेगळ्या ठिकाणी पथक थांबून कारवाई करीत आहेत. पाच दिवसात 929 केसेस करीत 2 लाख 11 हजार  रुपयांचा दंड वसूल केला आहे. वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारल्याने फॅन्सी नंबर, विना नंबर प्लेट दुचाकीस्वरांचे धाबे दणाणले आहेत. अल्पवयीन मुले, मुली भरधाव वेगाने दुचाकी चालवत होते. त्यांच्यावर कारवाई करण्यात येत असल्याने अशा दुचाकीस्वरांचीही संख्या कमी होऊ लागली आहे. पोलिसांच्या या कारवाईचे शहरवासीयातूनही वाहतूक शाखेचे कौतूक होत आहे.

Tags :  pandharpur, discipline, traffic