Mon, Apr 22, 2019 22:17होमपेज › Solapur › सोलापुरात 'एमपीएससी'च्या विद्यार्थ्यांचा मोर्चा (video)

सोलापुरात 'एमपीएससी'च्या विद्यार्थ्यांचा मोर्चा (video)

Published On: Feb 09 2018 1:08PM | Last Updated: Feb 09 2018 1:08PMसोलापूर : प्रतिनिधी

एमपीएससी व विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांनी मूक मोर्चा काढत शासनाविरोधात आपला निषेध व रोष व्यक्त केला. राज्यातील पदवीधर बेरोजगार हा खचत चालला असून एमपीएससीच्या माध्यमातून मोठी भरती घ्यावी, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली होती.

स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे लाखो विद्यार्थी राज्यात दरवर्षी एमपीएससीची परीक्षा देतात. या विद्यार्थ्यांसमोर विविध समस्या व अडचणी असून त्याचा फटका लाखो विद्यार्थ्यांना बसत आहे. राज्यसेवेची नुकतीच जाहिरात आली असून त्यामध्ये खूप कमी जागा आहेत. या जाहिरातीमध्ये 450 पेक्षा जास्त जागा वाढविण्यात याव्यात, अशी प्रमुख मागणी करत सात रस्ता ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मूक मोर्चा काढण्यात आला  होता.

परीक्षार्थींनी व विद्यार्थ्यांनी केलेल्या  मागणीनुसार संयुक्त परीक्षा रद्द  करून  पूर्वीप्रमाणे   पीएसआय, एसटीआय व एएसओ या पदांची स्वतंत्र परीक्षा घ्यावी, एमपीएससीने बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी घ्यावी, उत्तरपत्रिका तपासण्यासाठी बारकोड प्रणालीचा वापर करावा, राज्य शासनाने प्रत्येक पदांसाठी  प्रतीक्षा  यादी लावावी, एमपीएससीने परीक्षा केंद्रावर मोबाईल जॅमर लावावेत, तामिळनाडू राज्य लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा घ्याव्यात, तलाठीपदासाठी घेण्यात येणारी परीक्षा एमपीएससीच्या माध्यामातून घ्यावी, स्पर्धा परीक्षेतील डमी रॅकेट प्रकरणाची तपासणी सीबीआयमार्फत करावी, राज्य शासनाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुख्यालयासाठी जागा उपलब्ध करून  द्यावी, राज्य पातळीवरील रिक्त जागा व 23 हजार शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यात याव्यात, 30 टक्के नोकरकपात धोरण रद्द करण्यात यावे, वर्ग ‘क’ च्या सर्व भरती एमपीएससीच्या माध्यमातून घ्याव्यात, दुय्यम  निबंधक नोंदणी व मुद्रांकपदांची परीक्षा एसपीएससीमार्फत घ्यावी, डमी रॅकेट उघडकीस आणणार्‍या योगेश जाधव यांच्या संरक्षणामध्ये वाढ करण्यात यावी अशा मागण्या करत विद्यार्थ्यांनी जिल्हा मुख्यालयातील मुख्य प्रशासकीय अधिकार्‍यास निवेदन दिले.

यामध्ये सतीश मोरे, विकास वायकुळे, मुकेश माने, निखील बंडगर, रेश्मा वायकुळे, तेजश्री दोडमिसे, दिनेश  म्हस्के, रंजना व्हटकर, अश्‍विनी पाटील, प्रसाद मोहिते,  हिना सुभेदार, अमोल महिंद्रकर आदी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला होता.