Sun, Mar 24, 2019 12:46होमपेज › Solapur › मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत निर्णय 

मराठा आमदारांना आमच्या स्टाईलने जाब विचारु 

Published On: Jul 23 2018 10:24PM | Last Updated: Jul 23 2018 11:36PMसोलापूर : प्रतिनिधी  

मराठा आमदार वा मराठ्यांच्या मतांवर जे आमदार निवडून आलेले आहेत त्यांनी मराठा मोर्चा संदर्भात आपली भुमिका स्पष्ट करावी अन्यथा आपण आपल्या स्टाईलने त्यांना जाब विचारु अशी भुमिका आज मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत घेण्यात आली. सोलापूरातील शासकीय विश्रामगृहात आज मराठा क्रांती मोर्चातील आंदोलकांची बैठक झाली. यावेळी माजी उपमहापौर दिलीप कोल्हे,  प्रताप चव्हाण, भैय्या धाराशिवकर, दास शेळके आदी सर्व पक्षिय नेत्यांसह आंदोलक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

यावेळी दिलीप कोल्हे म्हणाले की,  मराठा समाज हा बुडणारा नाही तर बुडविणारा आहे हे सरकारला दाखवून देवू. शिवाय भारत भालके वगळता राज्यात कोणत्याच आमदारांनी मराठा आंदोलनाला उघड पाठिंबा दिला नाही, त्याबाबत त्याना जाब विचारला जाईल. तो कसा विचारायचा याबाबतचा कार्यक्रमही लवकरच करण्यात येइल.मुख्यमंत्र्यानी आंदोलनकर्ते मावळे होवू शकत नाहीत असे वक्तव्य केले, त्याच उत्तर त्यांना वारकरी त्यांच्या घरी परतल्यावर नक्कीच मिळेल. वारकऱ्यांनीसुध्दा आंदोलन केले होते हे मुख्यमंत्र्याने विसरु नये असेही त्यांनी यावेळी सुनावले. 

यावेळी दास शेळके म्हणाले की, सध्या अनेक ठिकाणी एसटी बस फोडण्याच्या व जाळण्याच्या घटना घडत आहेत. मात्र आपलेच वारकरी सध्या पंढरीत वारीसाठी आलेत त्यांना वारी संपवून घरी जाईपर्यंत आंदोलकांनी संयम बाळगावा. त्यानंतर आपण काय जाळायच व कसं जाळायच हे ठरवू. प्रारंभी आंदोलनात शहीद झालेले काकासाहेब शिंदे यांना अभिवादन करण्यात आले. 

२९ जुलैला जागरण गोंधळ 

येत्या २९ जुलै रोजी ठोक आंदोलनाची सुरवात म्हणून सोलापूर जागरण गोंधळ घालण्यात येइल. सकाळी अकरा ते सायंकाळी पाच पर्यंत रस्त्यावर हे आंदोलन करण्यात येइल. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व आंदोलकांनी सोलापूरात एकत्र यायचे आहे. त्या जागरण गोंधळानंतर आंदोलनाची दिशा ठरविण्यात येइल व साऱ्यांना मेसेज पोचविण्यात येइल. त्यानंतर ९ ऑगस्ट क्रांती दिनाच्या दिवशी महाराष्ट्र बंद हा ठरलेला आहे त्यात बदल नाही. तत्पूर्वी मंगळवारी काकासाहेब शिंदे या हुतात्म्याला श्रध्दांजली वाहण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व मराठा समाजाने सायंकाळी सात वाजता चार हुतात्मा पुतळा येथे जमावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले.