Thu, Jul 18, 2019 05:09होमपेज › Solapur › आयएमएसची अंध विद्यार्थिनी अवनी राठीला दहावीत 87  टक्के गुण

अंधार्‍या जगात ‘अवनी’ने निर्मिला गुणवत्तेचा प्रकाश

Published On: Jun 12 2018 12:54AM | Last Updated: Jun 11 2018 11:59PMसोलापूर : दीपक होमकर  

जन्मापासूनच तिच्या आयुष्यात काळोख दाटलेला.. अनेक प्रयत्न करूनही तिच्या वाटेला प्रकाशाचे किरण येतच नाहीत.. मात्र आयुष्य केवळ डोळ्याला दृश्यांनी सुंदर होत नाही, तर आपल्या सद्सद्विवेक बुध्दीच्या दृष्टितून ते अधिक सुंदर होतं हेच तिचं मत. त्याच बुध्दीच्या जोरावर डोळ्यांनी अंध असलेल्या अवनीने दहावीत तब्बल 87 टक्के गुण घेत आयुष्यात गुणवत्तेचा प्रकाश पाडला आहे.

ही गोष्ट आहे इंडियन मॉडेल स्कूलच्या अवनी जितेंद्र राठी या विद्यार्थिंनीची. अवनीला जन्मतःच दृष्टी नाही. इलेक्ट्रॉनिक्सचा अप्लायन्सेसचा पारंपरिक व्यवसाय असलेल्या तिच्या वडिलांनी पाण्यासारखा पैसा खर्च करत अनेक ठिकाणी तिला दृष्टी यावी यासाठी प्रयत्न केले. आईने तर प्रत्येक देवाच्या पायावर डोक ठेवत दृष्टीचं दान देण्यासाठी नवस बोलले; मात्र यश आलं नाही. त्यामुळे खचून न जाता अवनीच्या आई किशोरी यांनी अवनीला तिच्या पायावर उभं करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अवनी सहा वर्षांची असताना तिला येथील राजीव गांधी मेमोरिअल स्कूल या अंध मुलाच्या शाळेत तिला प्रवेश घेतला.

मात्र किशोरी यांना अपेक्षित असलेला शैक्षणिक दर्जा तिथे नव्हता. त्यामुळे त्यांनी मुंबईच्या अंध निवासी शाळेत तिला दाखल केले. सुमारे महिन्याभरत ती तिथे हॉस्टेलला राहिली खरी; मात्र तिथेही तिची अपेक्षित प्रगती झाली नाही. त्यामुळे अखेर त्यांनी पुन्हा येथील नॉर्मल मुलांच्या शाळेतच तिचा प्रवेश घ्यायचा निर्णय घेतला; मात्र अनेक शाळांनी तिला प्रवेश नाकारला. अखेर इंडिनय मॉडेल स्कूलने तिला प्रवेश दिला अन् तिच्या चांगल्या गुणवत्तेची जबाबदारीही घेतली. सर्वसामान्य मुलींप्रमाणे अवनीने रोज शाळेत इंग्रजीचे धडे घ्यायला सुरुवात केली. पहिलीपासून ते आठवीपर्यंत तिला प्रत्येक वर्षी 80 टक्क्यांपुढे गुण मिळायला लागले. नववीमध्ये विज्ञान आणि गणिताचा स्पेशल सिलॅबस आल्यामुळे ती पहिल्यांदाच 80 टक्क्यांच्या खाली आली. मात्र दहावीमध्ये  तिने 87 टक्क्यांपर्यंत मजल मारली.

शाळेमध्ये तिला कीर्ती हावनूर आणि किरण मारिया या दोन शिक्षिकांनी  आईच्या मायेने शिकविलं. त्यामुळे आजही ती त्यांना टीचर ऐवजी आई म्हणते, तर तेजश्री गज्जम आणि आकांक्षा जाधव या दोन जीवाभावाच्या मैत्रिणी म्हणजे शाळेतील तिचे जणू दोन डोळेच होत. शाळेच्या मुख्याध्यापिका अपर्णा कुलकर्णी यांनीही स्वतः अवनीला विशेष सुविधा दिल्याच शिवाय शिपायांपासून शिक्षकांपर्यंत अवनीकडे लक्ष देण्याच्या सक्‍त सूचनाही दिल्या होत्या.  

अवनी   पहिलीत असतानापासूनच तिच्या हाती लॅपटॉप आला. पहिल्या वर्षी तिला लॅपटॉप चालविताना काही अडचणी येऊ नयेत म्हणून तिच्याबरोबर शाळेतही एक मुलगी सहाय्यक म्हणून जायची. मात्र दुसरीपासून ती लॅपटॉपमध्ये इतकी परफेक्ट झाली की, तिच्या टायपिंगमध्ये एखादी चूक राहते ना फाईल सेव्ह करण्यात चुकते. जॉर्ज नावाच्या सॉप्टवेअरमुळे लॅपटॉचा साऊंड आणि त्याव्दारे तिची बोटे कि-बोर्डवर लिलया चालायला लागतात. आठवीपर्यंत तिने सर्व परीक्षाही लॅपटॉपवर दिल्या. नववी आणि दहावीत मात्र तिला रायटर घ्यावा लागला.

साहित्य, संगीतात करायचंय करिअर

अवनीचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व आहे. दहावीला जायच्या आतच तिने अनेक कविता केल्या अन् एकट्याने केलेल्या विमान प्रवासाचे प्रवास आत्मकथन लेखही ओघवत्या शब्दांत लिहिले. तिचा काव्यसंग्रहही प्रकाशित झाला आहे. साहित्याबरोबर तिला म्युझिकची गोडीही तितकीच अगदी चार वर्षांची असताना तिने हार्मोनियमवर राष्ट्रगीत वाजवून सार्‍यांनाच अचंबित केले. ती स्वतःच्या अनेक कवितांनाही संगीतबध्द करते. भविष्यात साहित्यिका आणि म्युझिशिअन व्हायच तिचं स्वप्न आहे.

अवनीनं इंडिपेंडंट व्हावं यासाठी मी अनेकदा कठोर होऊन अनेक वेगवेगळे प्रयोग करते. एकट्याने विमान प्रवास करायलाय लावण्याचा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे तिच्याबरोबर आमच्यातही आत्मविश्‍वास निर्माण झाला आहे. आता शिक्षणासाठी तिला एकटीला पुण्यात ठेवण्याचं धाडस करतोय. त्यातही ती नक्कीच यशस्वी होईल. - किशोरी राठी, अवनीची आई