Wed, Mar 27, 2019 01:57होमपेज › Solapur › जिल्ह्यातील कृषीसाठी ९ हजार कोटींचा आराखडा

जिल्ह्यातील कृषीसाठी ९ हजार कोटींचा आराखडा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी 

सोलापूर जिल्ह्यासाठी सन 2018-19 साठीचा 9114.15 कोटी रूपयांचा पतपुरवठा आराखडा सोमवारी जाहीर करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत हा आराखडा सादर करण्यात आला. या आराखड्यात कृषी आणि अनुषंगिक व्यवसायासाठी सुमारे 70 टक्के पतपुरवठा करण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे.

यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक शशिकांत भावसार, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक सुरेश श्रीराम, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक प्रदीप झिले, जिल्हा उद्योजकता विकास अधिकारी बी.टी. यशवंते, जिल्हा बँकेचे व्यवस्थापक किसन मोटे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले  म्हणाले, सोलापूर जिल्हा कृषी आणि संबंधित उद्योगावर अवलंबून आहे. त्यामुळे या आरखड्यात कृषी उद्योगाला दिलेले प्राधान्य महत्त्वाचे आहे. मात्र सर्व बँकांनी कृषी आणि कृषी आधारित उद्योग आणि शिक्षणासाठी आवर्जुन कर्जपुरवठा करावा.

गेल्यावर्षी पतपुरवठ्याचे उद्दिष्ट साध्य करण्यात काही बँकांना शक्य झालेले नाही. मात्र  यावर्षी     बँकांनी आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जोमाने प्रयत्न करावेत. त्यासाठी आवश्यक ते मनुष्यबळ मागवून घ्यावे. त्याचबरोबर कल्याणकारी योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचेल यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन डॉ. भोसले यांनी केले.

या पतपुरवठा आराखड्यात शेती आणि शेतीपूरक व्यवसायासाठी 70.90 टक्के, लघु आणि मध्यम उद्योगासाठी 19.35 टक्के पतपुरवठा अपेक्षित आहे. 2022 पर्यंत शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करणे आणि सर्वांसाठी घर उपलब्ध करणे याबाबी विचारात घेऊन पतपुरवठा आराखडा निश्‍चित करण्यात आल्याचे अग्रणी बँक व्यवस्थापक सुरेश श्रीराम यांनी सांगितले.
सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत, खासगी आणि ग्रामीण बँकांच्या 330 शाखा आहेत. त्याचबरोबर सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 212 शाखा आहेत. या एकूण 542 शाखांमधून पतपुरवठ्याचे वितरण अपेक्षित आहे, असेही श्रीराम यांनी सांगितले.

यावेळी जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत, खासगी आणि ग्रामीण बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. प्रास्ताविक श्रीराम यांनी केले. आभार श्रीनिवास कणगी यांनी मानले.
 


  •