Mon, Jul 22, 2019 01:15होमपेज › Solapur › 80 हजार मागासवर्गीय मुली शिष्यवृत्तीपासून वंचित 

80 हजार मागासवर्गीय मुली शिष्यवृत्तीपासून वंचित 

Published On: Jan 01 2018 2:09AM | Last Updated: Dec 31 2017 9:02PM

बुकमार्क करा
सोलापूर : प्रतिनिधी

जिल्हा परिषद व खासगी अनुदानित प्राथमिक शाळेत शिकणार्‍या 80 हजार मागासवर्गीय मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीपासून जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाने गेल्या दोन वर्षांपासून वंचित ठेवल्याने जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समिती तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा दिला आहे

राज्य शासनाच्या समाजकल्याण विभागामार्फत प्राथमिक शाळेत शिकणार्‍या  5 वी ते 8 वीच्या मागासवर्गीय मुलींना दरवर्षी रुपये 600 सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती दिली जाते.  याविषयीची ऑनलाईन माहिती जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापकांनी समाजकल्याण विभागाकडे भरली आहे शिवाय याची हार्डकॉपीही कार्यालयास दिलेल्या आहेत. पण अद्यापपर्यंत दोन वर्षांपासून या मुलींना शिष्यवृत्ती दिली गेली नाही. सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचा शाळेतील अनुसूचित जाती, जमाती व भटक्या जाती-जमाती संवर्गातील मुलींना लाभ मिळतो. पण त्यांना सन 2017-18 आणि  2018-19 या दोन  वर्षांपासून वंचित ठेवले गेले आहे. यासाठी अनेक वेळा  समन्वय समितीच्यावतीने पाठपुरावा केला तरीही याची काहीच दखल घेतली जात नाही. 

त्यामुळे सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्यावतीने जानेवारीअखेरपर्यंत मुलींच्या बँक खात्यांवर या रकमा जमा न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदन  जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी, समाजकल्याण अधिकारी, व  शिक्षणाधिकारी यांना दिले आहे. निवेदनाची  प्रत समाजकल्याणमंत्री नानासाहेब बडोले, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष,  शिक्षण समिती सभापती यांना  दिलेली आहे. 

यावेळी शिवानंद भरले, मच्छिंद्रनाथ मोरे, अनिल कादे, विद्याधर भालशंकर, सुधीर कांबळे, दिनेश क्षीरसागर, इकबाल नदाफ, जहांगीर शेख, रामचंद्र जाधव, वीरभद्र यादवाड व सूर्यकांत हत्तुरे-डोगे आदी उपस्थित होते.