Thu, Jun 27, 2019 12:25होमपेज › Solapur › वाखरी पालखी तळावर 784 कायम स्वरूपाची शौचालय पूर्णत्वास

वाखरी पालखी तळावर 784 कायम स्वरूपाची शौचालय पूर्णत्वास

Published On: Jul 11 2018 1:39AM | Last Updated: Jul 11 2018 12:05AMपंढरपूर : प्रतिनिधी

पालखी मार्गावरील सर्वात मोठा मुक्काम असलेल्या वाखरी ( ता. पंढरपूर ) येथील पालखी तळावर यंदा नव्याने उभा केलेली 784 कायमस्वरूपाची शौचालये बांधून पूर्णत्वास गेली आहे. यापुर्वीची सुमारे 1 हजारांवर कायमस्वरूपी शौचालये वारकर्‍यांच्या सोयीसाठी सज्ज होत आहेत. 

आषाढी यात्रेसाठी निघालेला पालखी सोहळा वाखरी येथे 21 जुलै रोजी मुक्कामासाठी येत असून त्यादिवशी  राज्यभरातून आलेल्या संतांच्या शेकडो पालख्या तसेच हजारो दिंड्यामधील 3 ते 4 लाखांवर भाविक वाखरी येथे मुक्कामी असणार आहेत. सर्वच पालख्यांचा वाखरी येथे संगम होत असून त्याठिकाणी संत मेळा भरत असतो. आणि वाखरी येथील मुक्काम संपवून सर्व पालख्या मिळून पंढरीत दशमीच्या दिवशी प्रवेश करीत असतात. त्यामुळे वाखरी येथील वाढती गर्दी व त्यानंतर निर्माण होणारी अस्वच्छता आणि आरोग्याचा प्रश्‍न लक्षात घेऊन प्रशासनाने तिर्थक्षेत्र विकास आराखड्यातून कायमस्वरूपी शौचालयांची उभारणी केली आहे. 

वाखरी येथील पालखी तळावर 7 ठिकाणी प्रत्येक 112 सिटस् असलेली शौचालय संकूले उभा केली आहेत. त्याचबरोबर तीन वर्षांपुर्वी तिर्थक्षेत्र आराखड्यातूनच एक दिडशे सीटस् असलेले शौचालय संकूल उभा केलेले आहे. शिवाय एका खासगी शिक्षण संस्थेने पालखी तळावरच फॅब्रीकेटेड स्वरूपाची सुमारे दिडशे शौचालये उभा केलेली आहेत. यात्रेच्या काळात स्थलांतरीत केली जाणारी फॅब्रीकेटेड शौचालये जागो-जागी उभा केली जातात.  त्यामुळे येथे गर्दी जरी जास्त असली तरीही पूरेशा प्रमाणात शौचालय सुविधा निर्माण केली गेली आहे आणि त्यामुळे यात्रेनंतर बर्‍यापैकी स्वच्छता राखण्यास मदत होत आहे.   मागील दिड वर्षांपासून या शौचालय संकुलाचे काम सुरू असून आता 784 कायमस्वरूपीची शौचालये बांधून पूर्ण केलेली आहेत. या शौचालय संकूलाजवळच भाविकांसाठी स्नानासाठीही सोय करण्यात आलेली आहे. सर्वच शौचालय संकुलातील मैला साठवण्यासाठी मोठा सेप्टीक टँक तयार करण्यात आला असून त्यातून मैलामिश्रीत पाणी यात्रेनंतर नगरपालिका उचलून नेणार आहे.  या शौचालयांचा वापर कार्तिकी, माघी आणि चैत्री यात्रांच्या काळात जनावरांच्या बाजारासाठीही चांगल्या प्रकारे होणार आहे. त्यामुळे भाविकांसह शेतकर्‍यांतून समाधान व्यक्त होत आहे.