Tue, Jul 16, 2019 01:36होमपेज › Solapur › आषाढी वारीसाठी मंगळवेढा आगाराकडून 71 गाड्यांची सोय 

आषाढी वारीसाठी मंगळवेढा आगाराकडून 71 गाड्यांची सोय 

Published On: Jul 18 2018 1:55AM | Last Updated: Jul 17 2018 9:15PMमंगळवेढा : तालुका प्रतिनिधी

आषाढी वारीच्या पार्श्‍वभूमीवर मंगळवेढा आगाराने यंदा भाविकांच्या सोयीसाठी 71 गाड्यांची सोय करून 40 हजार कि.मी. प्रवासाचे उद्दिष्ट ठेवल्याची माहिती आगारप्रमुख मधुरा जाधवर यांनी दिली.23 रोजी पंढरपूर येथे आषाढी वारी भरत असल्याने राज्यासह शेजारच्या कर्नाटक राज्यातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यांच्या  सोयीसाठी  मंगळवेढा आगाराने 22 ते 24 जुलैदरम्यान यंदा 71 बसेस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवेढा ते गोपाळपूरपर्यंतच या बसेस धावणार आहेत. गोपाळपूर येथे गाड्या सोडण्यासाठी छोटे नियंत्रण कक्ष उभे करण्यात आले आहे. 

यासाठी 2 कार्यशाळा कर्मचारी व 4 वाहतूक नियंत्रक असे 6 कर्मचारी तेथे नेमण्यात आले आहेत. मंगळवेढा आगाराकडे केवळ 64 बसेस आहेत. त्यापैकी 4 बसेस डिव्हिजनला असतात. त्यामुळे 60 बसेसवर वाहतूक यंत्रणा चालते. वारीसाठी कोकणातून मंगळवेढा आगाराला यंदा 7 गाड्या चालक-वाहकासह मिळणार आहेत. गतवर्षी 5 गाड्या उपलब्ध झाल्या होत्या. 22 रोजी रविवार व आषाढी एकादशी दिवशी शासकीय सुटी येत असल्याने या दोन्ही दिवशी शाळा, कॉलेज बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या बसेस वारीसाठी वापरल्या जाणार आहेत. पुणे,  मुंबईकडे जाणार्‍या बसेस या  कासेगावमार्गे  जातील,   तर पंढरपूरमधील विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणारे भाविक हे गोपाळपूर येथून उतरून पुढे जातील.  

रिंगण सोहळ्याप्रसंगी नातेपुते, शिंगणापूर अशा गाड्या ठेवण्यात आल्या आहेत. गोपाळकाला झाल्यानंतर कर्नाटकातील  भाविकांच्या परतीसाठीही जादा बसेसची सोय करण्यात आली आहे. मंगळवेढा बसस्थानकावर विद्यार्थ्यांना  पास काढताना ऊन, वारा, पाऊस  याला सामना करावा लागू नये यासाठी येथे  पत्र्याचे शेड उभे करण्यात येणार असल्याचा प्रस्ताव सोलापूर विभागाच्या अभियंत्यांना सादर करण्यात आला आहे. बसस्थानक नव्याने उभारल्यानंतर रंगरंगोटी करण्यात आली होती. लवकरच बसस्थानकाला रंगरंगोटी करण्यात येणार असल्याचे  जाधवर यांनी सांगितले.