होमपेज › Solapur › तरुणास 20 हजारांची खंडणी मागणार्‍या 7 जणांवर गुन्हा दाखल

तरुणास 20 हजारांची खंडणी मागणार्‍या 7 जणांवर गुन्हा दाखल

Published On: May 30 2018 11:11PM | Last Updated: May 30 2018 10:49PMसोलापूर : प्रतिनिधी

तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण करून 20 हजार रुपयांची खंडणी मागणार्‍या 7 जणांविरुद्ध सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल शिवाजी गायकवाड, विनायक अंबादास गायकवाड, तनीश विजय गायकवाड, तुषार शिवाजी गायकवाड (रा. सेटलमेंट कॉलनी, सोलापूर) आणि इतर 3 अनोळखी व्यक्‍ती यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वैभव शंकर नंदूरकर (वय 27, रा. सेटलमेंट कॉलनी नं. 2, विठ्ठल मंदिराजवळ, सोलापूर) याने फिर्याद दाखल केली आहे.

शनिवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास वैभव नंदूरकर हा त्याच्या दुचाकीवरून मोदी येथील बोगद्यातून घरी जात होता. त्यावेळी विशाल गायकवाड व इतरांनी नंदूरकर यास अडवून गोविंद मेडिकलच्या पहिल्या मजल्यावर नंदूरकर सुरू करीत असलेल्या हेल्थ क्‍लबसाठी दरमहा 20 हजार रुपये खंडणी दे असे म्हणाले. त्यावेळी नंदूरकर याने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर विशाल गायकवाड याने नंदूरकर यास तलवारीने मारण्याचा प्रयत्न केला, तर विनायक गायकवाड याने लोखंडी रॉडने नंदूरकर याच्या डोक्यावर मारून त्यास जखमी केले. तर इतरांनी बेस बॉलच्या व क्रिकेटच्या बॅटने खांद्यावर, हातावर, पायावर मारहाण करून जखमी केले. म्हणून सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक कजागवाले तपास करीत आहेत.