Thu, May 23, 2019 15:01
    ब्रेकिंग    होमपेज › Solapur › ६९ गावांचा कारभार पोलिस पाटलाविनाच

६९ गावांचा कारभार पोलिस पाटलाविनाच

Published On: Jan 21 2018 2:56AM | Last Updated: Jan 20 2018 8:12PMअंबाजोगाई : रवी मठपती 

अंबाजोगाई तालुक्यातील ६९ गावात पोलिस पाटीलच नसल्या कारणाने गावातील गुन्हेगारी पोलिस प्रशासनापर्यंत पोहचणे जिकिरीचे झाले आहे. पोलिस प्रशासनाला अनेक छोट्या-मोठ्या गुन्ह्यांची खरी माहिती गावात कोणाकडून घ्यायची, असाही प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहे. शासनाकडून पोलिस पाटलांची पदे अनेक वर्षांपासून भरली गेली नसल्याने पोलिस प्रशासनावर कामाचा ताण वाढला आहे. 

पोलिस पाटील शासनाचा हक्काचा माणूस आहे. पोलिस पाटीलाकडून  पोलिस प्रशासनाला मोठी मदत होत असते. गावात घडलेल्या गुन्ह्याची माहिती पोलिस अधिकार्‍यांना कळवायची ही पोलिस पाटलाची जिम्मेदारी आहे. गुन्ह्यातील वास्तव त्यास माहिती असते.  मिळालेल्या खर्‍या माहितीच्या आधारे पोलिस अधिकारी त्या दिशेने तपास करू शकतात. परंतु अंबाजोगाई तालुक्यातील पोलिस स्टेशन अंतर्गत येणार्‍या 88 गावांपैकी अवघ्या 19 गावात पोलिस पाटील कार्यरत आहेत, अशी माहिती अंबाजोगाई ग्रामीण पोलिस स्टेशन व बर्दापूर पोलिस ठाण्यातून देण्यात आली. 

अंबाजोगाई ग्रामीण पोलिस स्टेशन अंतर्गत 44 गावांचा कारभार आहे. तसेच बर्दापूर पोलिस स्टेशन अंतर्गत 44 गावांचे कार्यक्षेत्र आहे. अंबाजोगाई ग्रामीण पोलिस स्टेशन अंतर्गत अवघ्या दहा गावांमध्ये पोलिस पाटील नियुक्त आहेत. तर बर्दापूर पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात नऊ गावात पोलिस पाटील कार्यरत आहेत. अनेक वर्षांपासून ही पदे रिक्त आहेत. काही ठिकाणी सेवानिवृत्त झाले आहेत. शासनाकडून नवीन पदे गेल्या अनेक वर्षांपासून भरले गेले नाहीत. ज्याठिकाणी पोलिस पाटील कार्यरत आहेत तिथली गुन्ह्याची माहिती पोलिस प्रशासनाला कळते, परंतु ज्या 69 गावात पोलिस पाटीलच नाहीत, त्याठिकाणच्या गुन्ह्याची माहिती अनेकदा लपून राहते. स्थानिक पातळीवर त्याचा तात्पुरता  निपटारा केला जातो असल्याचे दिसून येते.पोलिस पाटलास गुन्ह्याची माहिती पोलिसांना देणे बंधनकारक आहे, तसे ग्राम सुरक्षा दलास अथवा पोलिस मित्रांना नाही.