Wed, Jan 23, 2019 16:54होमपेज › Solapur › गुळपोळी सोसायटीत 68 लाखांचा अपहार 21 जणांवर गुन्हा दाखल

गुळपोळी सोसायटीत 68 लाखांचा अपहार 21 जणांवर गुन्हा दाखल

Published On: Sep 10 2018 11:18PM | Last Updated: Sep 10 2018 10:26PMबार्शी : तालुका प्रतिनिधी 

गुळपोळी, ता. बार्शी येथील वि. का. सेवा सहकारी संस्थेत तत्कालीन संचालक, चेअरमन, बँक निरीक्षक, सचिव यांनी मिळून  68 लाख 36 हजार 86  रुपयांचा अपहार केल्याची फिर्याद लेखापरीक्षक राजकुमार भानुदास तिपे   (वय 36, रा. उपळाई (खुर्द), ता. माढा) यांनी बार्शी तालुका पोलिस ठाण्यात दिली आहे.

याप्रकरणी संस्थेचे तत्कालीन सचिव, तत्कालीन बँक इन्सपेक्टर व तत्कालीन संचालक मंडळ अशा 21 जणांवर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संताजी वांगदरे (सचिव), नरसिंह वांगदरे (बँक शाखा निरीक्षक, कोरफळे), संभाजी डोईफोडे (बँक शाखा निरीक्षक), गोविंद शिंदे, राजाराम मचाले (चेअरमन) व संचालक गोविंद चिकणे, शिवाजी बारवकर, लक्ष्मण शिंदे, रामचंद्र चिकणे, भागवत फोके, नेमिनाथ जैन, बाबासाहेब चिकणे, विलास माळी, आनंदकुमार नरखडे, दिगंबर काळे, बिभिषण पवार, कल्याण चिकणे, प्रभाकर चौधरी, आशा चिकणे, लता डोके, विलास सावंत  अशी अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. 

लेखापरीक्षक  तिपे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,   30.9.15 व 27.9.16 रोजी गुळपोळी वि. का. सेवा.सह. संस्था या संस्थेचे 1.4.2008 ते 31.3.2017 याकालावधीत लेखापरीक्षण करण्यासाठी संस्थेचे वार्षिक सभा ठराव प्राप्त झाले. त्यानुसार त्यांनी  लेखापरिक्षण करून तसा अहवाल तयार करून 27.6.18 रोजी अहवाल संबंधित संस्थेस व सहा. निबंधकांसह संस्था बार्शी या कार्यालयास सादर केला.

या लेखापरीक्षणामध्ये 1.4.2008 ते 31.3.2017 याकालावधीत सभासद कर्ज वसुलीची रक्‍कम वसूल करून पुन्हा पुन्हा कर्ज वाटप करून सभासद कर्ज वसुलीची  रक्‍कम बँक भरणा न करता संस्थेच्या सार्वजनिक मालमत्तेचा हेतुपुरस्सर  जाणूनबुजून फसवणूक व विश्‍वासघात करून रक्‍कम स्वतःच्या हितासाठी वापरून अपहार झालेला आहे. तसेच वसूलपात्र रकमेची आर्थिक व्यवहारातील अनियमितता झालेली आहे. लेखाधिकारी यांच्या फिर्यादीवरून गुळपोळी विविध कार्यकारी सेवा सह. संस्थेचे तत्कालिन सचिव, तत्कालीन बँक इन्स्पेक्टर व तत्कालीन संचालक मंडळ यांनी संगनमत करून, सभासद कर्ज वाटपाची वसुली करून पुन्हा पुन्हा कर्जवाटप करून रक्‍कम भरणा न करता स्वतःच्या हितासाठी वापरून, अपहार करून संस्था व बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्‍वर बेदरे हे करत आहेत.