Fri, Jul 19, 2019 17:54होमपेज › Solapur › शिक्षकांचे ६५ लाख पाण्यात

शिक्षकांचे ६५ लाख पाण्यात

Published On: Apr 12 2018 1:18AM | Last Updated: Apr 11 2018 10:38PMसोलापूर : प्रतिनिधी

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील वेतन अधीक्षक कार्यालयाच्या  भोंगळ कारभारामुळे खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षकांसाठी आलेला 65 लाख रुपयांचा वरिष्ठ वेतनश्रेणी निधी राज्य शासनाकडे परत गेला आहे. या प्रकारामुळे खासगी शाळेतील सुमारे 42 शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणीवर पाणी सोडण्याची वेळ आली आहे.

या प्रकारामुळे शिक्षण विभागाच्या कारभारावर टीका होत आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागात वेतन अधीक्षक कार्यालय आहे. या कार्यालयाकडून खासगी प्राथमिक शाळेत कार्यरत असणार्‍या शिक्षकांना वेतन व पगारवाढीचा लाभ देण्यात येतो.

12 वर्षांपेक्षा जास्त सेवा  झालेल्या शिक्षकांना वरिष्ठ श्रेणीचा लाभ देण्यात येतो. त्यानुसार 46 खासगी प्राथमिक शाळेतील सुमारघ 42 शिक्षकांचे प्रस्ताव शिक्षकांकडे प्राप्त झाले होते. 31 मार्चपर्यंत शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी योजनेचा लाभ देणे आवश्यक होते. मात्र, प्राथमिक शिक्षण विभागातील अधिकार्‍यांच्या अधिकारांचा वाद निर्माण झालेला असल्याने शिक्षकांना वेळेत वरिष्ठ श्रेणीचा लाभ मिळालेला नाही.

या प्रकारामुळे शिक्षकांना 65 लाख रुपये मिळण्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी आलेली रक्‍कम वेळेत खर्च न झाल्याने ही रक्‍कम राज्य शासनाकडे परत केली आहे. यामुळे खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षकांत संताप पसरला आहे. या प्रकाराची संपूर्ण चौकशी करून याप्रकरणी दोषी असणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिक्षकांकडून करण्यात येत आहे. याप्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजेंद्र भारूड हे काय भूमिका घेतात, याकडे शिक्षकांची aलक्ष लागले आहे.

कर्जमाफीसारख्या योजनेमुळे राज्य शासन अनेक योजनेतील निधी कपात करीत आहे. त्यामुळे वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी राज्य शासनाकडे परत गेलेली ही रक्‍कम आता परत जिल्हा परिषदेस मिळण्यास विलंब लागण्याची शक्यता आहे.