Tue, Apr 23, 2019 01:37होमपेज › Solapur › कर्जमाफीत नसलेल्या शेतकर्‍यांकडे 600 कोटी थकीत

कर्जमाफीत नसलेल्या शेतकर्‍यांकडे 600 कोटी थकीत

Published On: Aug 31 2018 1:43AM | Last Updated: Aug 30 2018 10:33PMसोलापूर : महेश पांढरे

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आता कर्ज वसुलीकडे चांगलेच लक्ष केंद्रीत केले असून सध्या बँकेवर प्रशासक असल्याने कर्ज वसुलीला चांगलीच गती आली आहे. कर्जमाफीमुळे बर्‍याच शेतकर्‍यांनी परतफेडीकडे दुर्लक्ष केले होते. सरकारच्या कर्जमाफीत न बसणार्‍या 70 हजार शेतकर्‍यांकडे बँक कर्जाची जवळपास 600 कोटी रुपयांची थकबाकी असून या वसुलीसाठी आता विषेश मोहीम हाती घेण्यात आली असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक तथा प्रशासक अविनाश देशमुख यांनी दिली आहे.

प्रशासक देशमुख यांनी बुधवारी जिल्हा बँकेची आढावा बैठक घेतली. यामध्ये 36 मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये मोठ्या थकबाकीदारांवर कायदेशीर कारवाई करणे, 109 प्रकरणांतर्गत केसेस दाखल करणे, कर्जमाफीतील शेतकर्‍यांना लाभ देणे, नव्याने कर्ज वाटपासाठी विविध शाखांनी ठेवी गोळा करणे अशा विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. दुसरीकडे जिल्हा बँकेत सध्या कर्जमाफीची मोहीम सुरु आहे. यामध्ये लाखो शेतकर्‍यांना लाभ झालेला असून काही शेतकर्‍यांना लाभ देण्याचे काम सुरु आहे. मात्र कर्जमाफीच्या धांदलीत ज्या शेतकर्‍यांच्या कर्जाची मुदत जून 2017 संपते असे शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र होत नाहीत. अशा शेतकर्‍यांची यादी तयार करण्यात आली असून जवळपास अशा 70 हजार शेतकर्‍यांकडे 603 कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आर्थिक परिस्थिती ढासळत चालली असून यासाठी आता विशेष मोहीम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती देशमुख यांनी दिली आहे.

रणजितसिंह पशु-पक्षी संस्थेने भरले पावणेदोन कोटी
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने काही वर्षांपूर्वी कर्ज दिलेल्या रणजितसिंह बिगरशेती पशु-पक्षी सहकारी संस्थेने बँकेची 1 कोटी 80 लाख 55 हजार रुपयांची थकबाकी भरली आहे. मोठ्या संस्थांकडील थकबाकीवर अधिक लक्ष केंद्रीत करण्यात आल्याने लवकर बँक पूर्व स्थितीवर येईल, असा विश्‍वास प्रशासकांनी व्यक्त केला आहे.

कर्ज वसुलीसाठी कर्मचार्‍यांना विशेष प्रशिक्षण  
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची थकबाकी सध्या प्रचंड वाढली असून याच्या वसुलीसाठी प्रशासकांनी आता पावले उचलली आहेत. कर्ज वसुली व्हावी यासाठी कर्मचार्‍यांना दोन दिवसांचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे प्रशिक्षित केलेल्या कर्मचार्‍यांची विषेश पथके बनवून त्यांना वसुलीसाठी पाठविण्यात येणार आहे.