Sat, Jul 20, 2019 21:42होमपेज › Solapur › गादेगावात ६ घरे जळून खाक

गादेगावात ६ घरे जळून खाक

Published On: May 19 2018 1:36AM | Last Updated: May 18 2018 10:19PMपंढरपूर : प्रतिनिधी

गादेगाव (ता. पंढरपूर) येथील झिरपी मळा परिसरात शेतमजुरांची 6 घरे पूर्णपणे जळून खाक झाली. शुक्रवारी (दि. 18) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली असून, आगीचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. या घटनेत आठ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, सायंकाळी उशिरापर्यंत पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू होती. 

गादेगाव येथील झिरपी मळा या परिसरात शेतमजुरी करणार्‍या कुटुंबाची छप्पराची घरे आहेत. सलग असलेल्या या घरांना शुक्रवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. सर्व घरे पाचटाच्या छप्पराची असल्यामुळे बघता-बघता सहा घरांना आगीने आपल्या कवेत घेतले. परिसरातील लोकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. तसेच घरातील प्रापंचिक वस्तू घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला; परंतु आग झपाट्याने पसरल्यामुळे घरांतील महत्त्वाच्या वस्तू बाहेर काढणे शक्य झाले नाही. श्रीयाळ देवाप्पा देशमुख, प्रकाश राऊ बाबर, जीवन प्रकाश बाबर, इंदुमती माऊली शिंदे, लक्ष्मण माणिक पाखरे, माणिक निवृत्ती पाखरे यांची घरे या आगीत पूर्णपणे जळून खाक झाली.

सर्व घरे छप्पराची असल्यामुळे काही मिनिटात आगीने सर्व घरांचा फडशा पाडला. अग्निशामक बोलावण्याचीही वेळ मिळाला नाही. घरांतील सर्वच प्रापंचिक वस्तू आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यामुळे सर्व सहा कुटुंबे उघड्यावर आलेली आहेत. सहा कुटुंबांचे या आगीत सुमारे 6 ते 8 लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्‍त होत आहे. गाव कामगार तलाठी श्रीकांत कदम यांनी नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम सुरू केले आहे.