होमपेज › Solapur › आगीत 6 सिटी बसेस जळून खाक

आगीत 6 सिटी बसेस जळून खाक

Published On: Jan 03 2018 1:18AM | Last Updated: Jan 02 2018 10:50PM

बुकमार्क करा
सोलापूर : प्रतिनिधी

महापालिका परिवहन उपक्रमाच्या बुधवार पेठेतील डेपोला सोमवारी रात्री अचानक लागलेल्या आगीत सहा सिटी बसेस जळाल्या. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. या गंभीर बाबीची दखल घेत परिवहन समितीची विशेष सभा बुधवारी बोलाविण्यात आल्याची माहिती सभापती दैदिप्य वडापूरकर यांनी दिली. 

बुधवार पेठेतील डेपो हे संवेदनशील    ठिकाण समजले जाते. कारण या डेपोमध्ये सारख्या चोर्‍या होण्याचे प्रमाण आहे. यापूर्वी येथे परिवहन उपक्रमाचे कार्यालय होते. नंतर ते सात रस्ता याठिकाणी शिफ्ट करण्यात आले. गेल्या दोन-तीन वर्षांपासून हे कार्यालय राजेंद्र चौक येथे हलविण्यात आले आहे. बुधवार पेठ डेपोत मनपाच्या गाड्या दुरूस्त करण्याचे काम करण्यात येत असे. याकामी मनपा परिवहन उपक्रमाला मनपाकडून अनुदान दिले जाई. पण आयुक्‍तांनी हे पैसे देणे बंद करून बाहेरून गाड्या दुरूस्त करून घेण्याचा निर्णय तीन-चार महिन्यांपूर्वी घेतल्यापासून या डेपोतील दुरुस्तीचा विभाग बंद करुन तेथील कर्मचारी सात रस्ता डेपोमध्ये वर्ग करण्यात आले. याठिकाणी मानधन तत्त्वावर तीन सुरक्षारक्षक  काही महिन्यांपूर्वी होते, पण दुरूस्ती विभाग बंद केल्याने या सुरक्षारक्षकांना काढून परिवहन उपक्रमात हेल्पर म्हणून काम करणार्‍या सेवकावर सुरक्षेची जबाबदारी प्रशासनाने सोपविल्याची माहिती आहे.

या डेपोत सध्या अशोक लेलँड कंपनीच्या चेसी क्रॅक झालेल्या सुमारे 30 बसेस ठेवण्यात आल्या आहेत. या बसेसची मान्यता आरटीओने रद्द केल्याने या बसेस भंगारात काढल्यात जमा आहेत. सोमवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या या डेपोतील एका बसला अचानक आग लागली. ही आग पसरत जाऊन शेजारील बसेसही एकेक करीत पेट घेतल्या. यामध्ये एकूण सहा बसेस आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. दरम्यान, ही घटना समजताच परिवहन समितीचे सभापती दैदिप्य वडापूरकर, परिवहन व्यवस्थापक अभिजित हराळे, बसपचे नगरसेवक आनंद चंदनशिवे, कामगार नेते अशोक जानराव, अजित गायकवाड आदी घटनास्थळी पोहोचले. तोवर अग्निशमन दलाचा एक बंबही पोहोचला. हा बंब अपुरे पडल्याने आणखीन दोन बंब मागविण्यात आले. अर्ध्या तासात आग विझविण्यात यश आहे. घटनास्थळी पोलिस आयुक्त महादेव तांबडे, उपायुक्त अपर्णा गिते आदींनी भेट दिली. 

ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. शॉर्टसर्किटने ही आग लागली का याचा शोध घेण्यात आला. पण तसे कारण नसल्याचे समजले. या डेपोच्या सुरक्षेसाठी एकही माणूस नसल्याने व हे कामही एका हेल्परवर सोपविण्यात आल्याने परिवहन प्रशासन या डेपोच्या सुरक्षेकामी किती गंभीर आहे, ही बाब अधोरेखित झाली आहे. दरम्यान, या गंभीर प्रकाराची दखल घेत परिवहन समितीची विशेष सभा बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता बोलाविण्यात आल्याची माहिती सभापती वडापूरकर यांनी दिली. 

पोलिसांच्या पत्राकडे प्रशासनाचा कानाडोळा 

या डेपोमध्ये सारख्या चोर्‍या असल्याने याठिकाणी जादा सुरक्षारक्षक तैनात करावेत, असे पत्र सम्राट चौक पोलिस चौकीकडून परिवहन उपक्रमाला दोन-तीन वेळा देण्यात येऊनही याकडे दुर्लक्ष केल्याची माहिती आहे. परिवहन उपक्रमाच्या वर्क्स मॅनेजरकडे डेपोच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. या मॅनेजरने कर्तव्यात कसूर केली आहे का याची माहिती परिवहन समिती घेणार आहे.