Tue, Apr 23, 2019 01:37होमपेज › Solapur › बार्शी बाजार समितीसाठी 58 टक्के मतदान

बार्शी बाजार समितीसाठी 58 टक्के मतदान

Published On: Jul 02 2018 1:50AM | Last Updated: Jul 01 2018 11:49PMबार्शी : गणेश गोडसे

बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवार, 1 जुलै रोजी काही ठिकाणी झालेले किरकोळ बाचाबाचीचे प्रकार वगळता शांततेत  58 टक्के मतदान झाले.

रविवारी  सकाळी 8.00 वाजता शहर व तालुक्यातील 167 मतदान केंद्रावर मतदानाच्या प्रक्रियेस सुरूवात झाली. मतदान प्रक्रियेत उत्साह दिसून आला नाही. विशेष करून महिला मतदारांनी मतदान करण्याचे टाळले.

 शेतकर्‍यांना मतदानाचा हक्क मिळाल्यानंतर प्रथमच ही निवडणूक पार पडत  आहे. आपापल्या गावातील व शहरातील स्थानिक नेत्यांच्या घरातील सुहासिनींसह पक्षाच्या समर्थक महिलांच्या हस्ते मतदान पेटीचे पूजन करण्यात आले. सकाळी 10 वाजेपर्यंत मतदानाचा वेग मंदच होता. दहापर्यंत 13.23 टक्के मतदान झाले होते. त्यानंतर मतदानाचा वेग वाढत गेला. दुपारी 12 वाजेपर्यंत 28.18 टक्के मतदान झाले होते. तर दुपारी 3 वाजेपर्यंत 41 टक्के मतदान पार पडले होते. दुपारी चार वाजेपर्यंत तालुक्यातील 18 गणामध्ये 51.86 टक्के मतदान झाले होते. 

 आजी-माजी आमदारांसह त्यांच्या समर्थकांनी तालुक्यातील गणात जाऊन मतदानाची पाहणी केली. आ. दिलीप सोपल यांनी येळंब येथे, तर माजी आ. राजेंद्र राऊत यांनी जामगाव (आ) येथे मतदान केले. 

बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती पंचवार्षिक निवडणुकीसाठी 18 जागांसाठी 1,06,179 शेतकरी, व्यापारी व हमाल, तोलार हे मतदार मतदानासाठी पात्र ठरले होते. 59 उमेदवारांमध्ये लढत पार पडली आहे. 18 उमेदवारांसाठी आपल्या मतदानाचा  हक्क बजावून उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंदिस्त केले आहे. बंद करण्यात आलेला मतपेटीचा पेटारा मंगळवार, 3 जुलै रोजी सकाळी उघडण्यात येणार आहे. 

पांगरी येथील दोन केंद्रावर 2012 पैकी 1136, पांढरी येथे 364 पैकी 264, घारी येथे 752 पैकी 388, घोळवेवाडी येथे 279 पैकी 188, चिंचोली येथे 352 पैकी 211, झानपूर येथे 446 पैकी 207, उक्कडगाव येथे 1086 पैकी 787, पुरी येथे 668 पैकी 308, खामगाव येथे 870 पैकी 738, पाथरी येथे 402, पिंपळवाडी येथे 203, चारे-468, वालवड-172, धानोरे-226, बोरगाव-234, कुसळंब- 305, शिराळे-311, धामणगाव-168 मतदान झाले.

मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती. या निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी  केलेली होती. शनिवारी दुपारीच शहर व तालुक्यातील सर्व मतदान केंद्रावर एक केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, एक शिपाई यांना पाठवण्यात आले होते. तसेच प्रत्येक केंद्रावर पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. 167 मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पडली. मतदानानंतर सर्व मतपेट्या बार्शी शहरातील उपळाई रस्त्यावरील शासकीय धान्य गोदामामध्ये संकलित केल्या जाणार आहेत. तेथेच 3 जुलै रोजी सकाळी 8 वाजल्यापासून सुरु होणार आहे. मतदानानंतर आजी, माजी आमदारांनी विजयाचे दावे केले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी शिवाजी जगताप, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी ऋषिकेत शेळके, अभय कटके यांनी काम पाहिले. 

निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी विजय कबाडे, शहर पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील, ग्रामीण पोलिस ठाण्याचे स.पो.नि. रविंद्र खांडेकर, पांगरी पोलिस ठाण्याचे सपोनि सचिन हुंदळेकर, वैराग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुहास जगताप, स.पो.नि. धनंजय ढोणे यांच्यासह पोलिस कर्मचार्‍यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

असे झाले मतदान
आगळगाव गणात - 58.01 टक्के, पांगरी - 55.20, उक्कडगाव-69.36, जामगाव (आ)-61.64, उपळाई ठोंगे-42.14, मळेगाव-58.58, कारी-56.43, उपळे दुमाला-60.83, घाणेगाव-57.83, पानगाव-53.27, श्रीपतपिंपरी-54.60, सुर्डी-58.49, सासुरे-50.86, शेळगाव (आर) -67.06, भालगाव-61.68, हमाल-तोलार-84.94, आडत्या व्यापारी-91.38 असे तालुक्यात एकूण 58 टक्के मतदान झाले. 48,129 पुरूष, तर 13,426  महिला मतदारांनी मतदान केले. आडत्या, व्यापारी गणात सर्वाधिक 91.38, तर सर्वात कमी उपळाई ठोंगे गणात फक्त 42.14 टक्के मतदान झाले.