Fri, Sep 21, 2018 10:15



होमपेज › Solapur › 52 लाखांवर फसवणूक

52 लाखांवर फसवणूक

Published On: Mar 14 2018 10:08PM | Last Updated: Mar 14 2018 10:00PM



सोलापूर : प्रतिनिधी

एमबीबीएसला अ‍ॅडमिशन घेऊन देतो, असे सांगून शिक्षकाला 28 लाख रुपयांना फसविल्याप्रकरणामध्ये फसवणूक झालेल्या व्यक्‍तींची संख्या वाढून तीन झाली असून, फसवणुकीची रक्‍कमही 52 लाखांवर गेली आहे. त्यामुळे या गुन्ह्याची व्याप्ती वाढत असून फसवणुकीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

सीताराम विठ्ठल डोंगरे (वय 56, रा. सोमराईनगर, ता. मोहोळ)  यांच्या फिर्यादीवरून विजापूर नाका पोलिस ठाण्यात संदीप जवाहर शहा (41, रा. फुरडे रेसिडेन्सी, विजापूर रोड), अंबिका प्रसाद मिश्रा (रा. पठाणवाडी, मालाड पूर्व, मुंबई), कल्पना अनिल पगारे (रा. कलानगर, बांद्रा  पूर्व, मुंबई), पांडे, रवींद्र मोरये (दोघे रा. मुंबई) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून संदीप शहा व कल्पना पगारे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. 

सीताराम डोंगरे यांच्या मुलीला सन 2018 मध्ये संदीप शहा व इतरांनी एमबीबीएस, बीएएमएस, पोस्ट  ग्रॅज्युएट इन मेडिसिन या विभागात चांगल्या वैद्यकीय महाविद्यालयात   व्यवस्थापन कोट्यातून अ‍ॅडमिशन घेऊन देतो, असे सांगितले. डोंगरे हे मराठा असून ते खुल्या प्रवर्गात येतात. डोंगरे यांना  शहा व  इतरांनी कोणतीही पूर्व   कल्पना  न  देता एमएचसीईटीचा फॉर्म डोंगरे हे खुल्या प्रवर्गातील असतानाही एसटी या प्रवर्गातून भरून महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर  चुकीची व खोटी माहिती भरली.

 तसेच वैद्यकीय महाविद्यालयामध्ये केंद्राच्या पूल व्यवस्थापन कोट्यातून अ‍ॅडमिशन करून देतो, असे खोटे सांगून बनावट अ‍ॅडमिशन फॉर्मस बनवून ते खरे असल्याचे सांगून डोंगरे यांच्याकडून ते फॉर्म भरुन घेतले. तसेच सन 2015-16 व सन 2016-17 या शैक्षणिक कालावधीचे नुकसान करून डोंगरे यांच्याकडून वेळोवेळी 28 लाख रुपये घेतले. शहा व इतरांचा खोटेपणा उघड झाल्यानंतर डोंगरे यांनी त्यांच्याकडे पैशाची मागणी केली असता त्यांनी उडवाउडवी करुन दमदाटी केली. म्हणून डोेंगरे यांनी याबाबत विजापूर नाका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करुन गुन्हा दाखल केला. 

या  गुन्ह्याचा तपास करताना आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संदीप शहा व कल्पना पगारे या दोघांना अटक केली आहे. तर इतर आरोपींच्या शोधासाठी पोलिसांचे पथक मुंबईला गेले होते, परंतु, आरोपींचा  शोध लागला नाही.  या गुन्ह्यात  फसवणूक झालेले तक्रारदार वाढले असून फसवणुकीची रक्‍कमही 52 लाखांवर गेली आहे. सहायक पोलिस निरीक्षक सचिन पवार तपास करीत आहेत.