Thu, Jul 18, 2019 06:53होमपेज › Solapur › पारंपरिक दिंड्यांसाठी 50 प्लॉट राखीव; खुल्या जागेतील 160 प्लॉटचे केले वाटप

भक्‍तिसागर येथे २८८ प्लॉटचे वाटप

Published On: Jul 19 2018 1:40AM | Last Updated: Jul 18 2018 8:43PMपंढरपूर : सुरेश गायकवाड

आषाढी यात्रा सोहळ्यासाठी येणार्‍या पालख्या व दिंड्यासाठी 65 एकरांतील भक्‍तिसागरमध्ये असलेल्या 427 प्लॉट पैकी 288 प्लॉटचे वाटप पहिल्याच दिवशी करण्यात आले आहे. तर 50 प्लॉट संत ज्ञानेश्‍वर व संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. भाविकांची वाढती मागणी लक्षात घेऊन खुल्या जागेत 160 प्लॉटचे वाटप करण्यात आले आहे. येथे वास्तव्यास येणार्‍या भाविकांना अत्यावश्यक सेवा सुविधा पुरवण्यात येत आहेत.

भक्‍तिसागर येथे आषाढी यात्रेकरिता आलेल्या पालख्या, दिंड्यांतील भाविकांना वास्तव्यासाठी येथे मोफत प्लॉट वाटप करण्यात येत आहे. या ठिकाणी एकूण 427 प्लॉट आहेत. यापैकी 17 प्लॉट येथे तयार करण्यात आलेल्या रस्त्यांसाठी वापरण्यात आले आहेत. त्यामुळे येथे भाविकांना वापरण्यासाठी 353 प्लॉट उपलब्ध आहेत. यापैकी प्लॉट वाटप करण्याच्या पहिल्याच दिवशी पालखी व दिंडी प्रमुखांनी रांगा लावत प्लॉटचे बुकिंग केले आहे. पहिल्या दिवशी 204 अर्ज प्राप्त झाले आहेत. या 204 अर्जदारांना भाविकांची संख्या व मागणीनुसार 288 प्लॉटचे वाटप करण्यात आले आहे. यात 1 गुंठा, 2 गुंठे, पाच गुंठे या प्रमाणात प्लॉटचे वाटप करण्यात आले आहे.

यावर्षीच्या आषाढी यात्रेत भक्‍तिसागर येथे 170 नवीन दिंड्याची भर पडली आहे. त्यांच्याकडून प्लॉटची वाढती मागणी लक्षात घेऊन प्रशासनाच्यावतीने येथील रेल्वेची 15 एकर असलेल्या खुल्या जमिनीवर प्लॉट तयार करून भाविकांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या ठिकाणी 160 प्लॉटचे वाटप केले आहे. येत्या दोन दिवसांत संपूर्ण प्लॉटचे वाटप पूर्ण होणार आहे.  येथील आपत्कालीन व्यवस्थापन केंद्र येथे प्लॉटचे वाटप करणे, भाविकांना  बुकिंग केलेल्या प्लॉटची जागा दाखवणे, प्लॉटची सीमा रेषा आखणे आदी कामे करण्यासाठी 15 कर्मचारी दोन शिफ्टमध्ये काम पाहत आहेत.

संत ज्ञानेश्‍वर महाराज व संत तुकाराम महाराज या पारंपारिक दिंड्यासाठी 50 प्लॉट राखीव ठेवण्यात आले आहेत. प्लॉटचे बुकिंग पूर्ण केलेल्या भाविकांनी राहुट्या उभारण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भक्‍तिसागर येथे भाविकांच्या उपस्थितीने वातावरण भक्‍तिमय होऊ लागले आहे.

भक्‍तिसागर येथे एकूण 427 प्लॉटपैकी 353 प्लॉट भाविकांसाठी उपलब्ध आहेत. यापैकी 288 प्लॉटचे वाटप करण्यात आले असून पारंपारिक मानाच्या पालख्यातील दिंड्यांना 50 प्लॉट राखीव ठेवण्यात आले आहेत. भाविकांच्या मागणीनुसार खुल्या जागेतही प्लॉट तयार करून वाटप केले जात आहे.  -किशोर बडवे -नायब तहसीलदार तथा आपतकालीन केंद्र प्रमुख भक्‍तिसागर