Thu, Apr 25, 2019 15:34होमपेज › Solapur › लोकसहभागातून होणार  ५ हजार ७०० वनराई बंधारे 

लोकसहभागातून होणार  ५ हजार ७०० वनराई बंधारे 

Published On: Aug 21 2018 1:41AM | Last Updated: Aug 20 2018 11:35PMसोलापूर : प्रतिनिधी

ग्रामीण भागातील सर्व गावांत 2 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर याकालावधीत प्रत्येक गावात 5 याप्रमाणे लोकसहभागातून 5 हजार 700 वनराई बंधारे बांधण्यात येत आहेत. जि.प. अध्यक्ष संजय शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्या पुढाकाराने हा उपक्रम सुरु असून शेतकर्‍यांना सिंचन व्यवस्था निर्माण करुन देण्याचा प्रयत्न असल्याची माहिती जि.प. लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता तु.सु. देवकर यांनी दिली.

एका वनराई बंधार्‍यासाठी दीडशे सिमेंट पोती आवश्यक असून गावातील सरपंच, ग्रामसेवक यांनी लोकसहभागातून दीडशे पोती जमा करुन या पोत्यात मुरुम माती टाकून गावातील ओढा व नाल्यात वनराई बंधारे घालावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. या सूचनेनुसार नियोजन करण्यात येत असून  हा उपक्रम पूर्णपणे लोकसहभागातून यशस्वी करण्याचे नियोजन आहे. जिल्हा परिषदेने निर्माण केलेल्या 5 हजार 700 वनराई बंधार्‍यांमुळे 402 दशलक्ष घनफूट पाणीसाठा निर्माण होण्यास मदत होणार असून सुमारे 3 हजार 216 हेक्टर क्षेत्रासाठी पाणी निर्माण करण्यात येत आहे. या उपक्रमामुळे शेतकर्‍यांचे सुमारे 8 कोटी 40 लाख रुपये उत्पन्न वाढण्याचा अंदाज आहे. या उपक्रमात सुमारे 1 कोटी 94 लाख रुपयांचे श्रममूल्य मोफत ग्रामस्थांकडून होण्याची अपेक्षा आहे. वनराई बंधार्‍यामुळे शेताच्या शिवारातच पाणी अडवून पाणी जिरवण्यात येत असल्यामुळे उन्हाळ्यात या परिसरातील विहिरी, बोअरवेल आदी पाणीस्त्रोतांना पाणी उपलब्ध होणार आहे.  अध्यक्ष  शिंदे, सीईओ डॉ. भारुड यांच्या सूचनेनुसार लघुपाटबंधारे विभागाकडून हा उपक्रम मिशन मोडवर घेण्यात आला आहे.

यासाठी ग्रामसेवक व सरपंच यांचे योगदान घेण्यात येत आहे. जि.प. कृषी खात्याकडून व गावातील कृषी दुकानदारांकडून मोफत सिमेंटची पोती देण्यात येत आहेत. रिकाम्या पोत्यात माती व मुरुम देण्यासाठीही गावातील काही शेतकरी पुढे येत आहेत. वनराई बंधार्‍याच्या माध्यमातून पाणी अडविण्यासाठी श्रमदान करण्यासाठी प्रत्येक गावातील तरुणाईने पुढे यावे, असेही आवाहन जिल्हा परिषदेकडून करण्यात आले आहे.