Fri, Apr 26, 2019 03:24होमपेज › Solapur › मुले पळविण्याच्या अफवेने 5 तरुणांचा बळी

मुले पळविण्याच्या अफवेने 5 तरुणांचा बळी

Published On: Jul 01 2018 5:27PM | Last Updated: Jul 01 2018 11:55PMधुळे/सोलापूर/मंगळवेढा : प्रतिनिधी

मुले पळविणारी टोळी असल्याच्या संशयातून ग्रामस्थांनी पाच भिक्षुकांना  अक्षरशः ठेचून ठार मारले. ही धक्कादायक घटना धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील राईनपाडा गावात रविवारी भर दुपारी घडली. घटनेतील चार मृत सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील रहिवाशी आहेत, तर एक जण कर्नाटकातील रहिवाशी आहे. ते भटक्या जातीमधील असून भिक्षा मागण्यासाठी धुळे जिल्ह्यात गेले होते.

 दादाराव शंकर भोसले (वय 45), भारत शंकर भोसले (36), भारत शंकर माळवे, (45, तिघे. रा. खवे), आप्पा श्रीमंत इंगोले (19, रा. मानेवाडी), राजू भोसले (47) अशी मृतांची नावे आहेत. राजू भोसले कर्नाटकमधील चडचण येथील गुणावन या गावचा आहे. त्याचे नातेवाईक मंगळवेढा तालुक्यातील असून तो येथे राहत असे. 
या हत्याकांडाचे वृत्त समजल्यानंतर संपूर्ण मंगळवेढा तालुक्यात शोकावस्था पसरली असून लोक भीतीच्या सावटाखाली आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातही गेल्या आठवड्यात मुले पळविण्याच्या अफवेतून बहुरुप्यांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली होती.

धुळे जिल्ह्यामध्ये गेल्या महिन्याभरापासून मुले चोरणारी टोळी आल्याची अफवा मोठ्या प्रमाणावर पसरली आहे. नंदुरबार जिल्ह्यात अशा संशयातून मारहाणीच्या घटना घडल्या आहेत. राईनपाडा येथे दर रविवारी आठवडे बाजार असतो. त्यामुळे परिसरातील आदिवासी पाड्यांमधून मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ खरेदीसाठी आले होते. राईनपाडालगतच्या  काकरपाडा येथे मुले पकडणारी टोळी फिरत असल्याची अफवा बाजारात पसरली. त्यामुळे काही तरुणांनी या पाड्यावर जाऊन पाहिले असता गावात भिक्षा मागणारे पाच जण त्यांना फिरताना दिसले. या तरुणांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण करीतच सर्वांना राईनपाडा गावातील ग्रामपंचायतीच्या सभागृहात आणले. यादरम्यान त्यांना मारहाण करणे सुरूच होते. पाचही तरुणांना कार्यालयाच्या एका खोलीत कोंडण्यात आले. मात्र, संतप्त जमावाने लोखंडी दरवाजे तोडून आत प्रवेश केला. यानंतर दगड, लोखंडी खुर्च्या आणि अन्य वस्तूंनी डोक्यावर गंभीरपणे मारहाण करून या पाचही तरुणांना अक्षरशः ठेचण्यात आले. 

वाचा : ब्‍लॉग : 'सोशल' आंधळ्यांचं कृष्णकृत्य

या मारहाणीत पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर राईनपाडासह परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. या घटनेची माहिती कळताच धुळ्याचे पोलिस अधीक्षक रामकुमार, अप्पर पोलिस अधीक्षक विवेक पानसरे, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांच्यासह निरीक्षक दिवाणसिंह वसावे, हेमंत पाटील यांनी राईनपाडा गावात धाव घेतली. 

यावेळी संतप्त जमावाने पोलिस पथकालादेखील गावात येण्यास विरोध दर्शविला. तब्बल एक तासानंतर हे पथक गावात पोहोचले. 
यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात रवाना करण्यात आले.

अफवेने घेतला बळी

राईनपाडा गावात आठवडे बाजार असल्याने पैसे मिळतील या आशेने हे तरुण या गावात आले होते. मात्र, अफवेने या सर्व तरुणांचा बळी गेला आहे. यातील एका तरुणाचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला असून, या मोबाईलच्या माध्यमातून मयत तरुणांची ओळख पटविण्याचे काम सुरू झाले आहे. 

या घटनेची माहिती मिळताच मंगळवेढा तालुक्यातील नाथपंथी, डवरी, गोसावी समाजात प्रचंड भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यात कचरेवाड़ी, खवे, गणेशवाडी, निंबोनी, जित्ती, बावची, लवंगी, मारोळी, हुन्नूर, मानेवाडी,  महमदाबाद  या गावांत हा समाज रहात असून अनेक वर्षांपासून देशभरात विविध ठिकाणी भिक्षा मागण्यांसाठी ते फिरत आहेत.  मात्र अशी घटना घडल्याने भीती आणि घबराट निर्माण झाली आहे. प्रत्येक जण आपले नातेवाईक कुठे आहेत. कसे आहेत. याचा मागोवा घेत आहेत. तालुक्यात या घटनेने खळबळ माजली असून फिरून पोटाची खळगी भरणार्‍या या समाजाला आता चिंता निर्माण झाली आहे. पाठीमागे घरी असणार्‍या नातेवाइकांना या घटनेने जबर धक्का बसला असून ते अधिक काळजीत आहेत. जमेल त्या मार्गाने ते बाहेर फिरणार्‍या आपल्या माणसांना संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहेत.

खवे येथील दादाराव भोसले हे अतिशय मनमिळाऊ आणि सामाजिक कार्याची आवड असणारे व्यक्तिमत्व होते.  ते गावात असताना नेहमी लोकांत मिसळत असत अशी आठवण सरपंच पंडित पाटील यांनी सांगितली. दादाराव भोसले यांच्या पाठीमागे त्यांची आई गंगाबाई ही वयोवृद्ध आहे. वडील  25 वर्षापूर्वी स्वर्गवासी झाले आहेत. याशिवाय त्यांचे लग्न तीन वर्षांपूर्वी झाले आहे. पत्नी सोबतच आहे. त्यांचा सख्खे चार आणि चुलत चार असा आठ भावांचा परिवार असून फक्त तीन एकर शेती आहे. मानेवाडी येथील आप्पा इंगोले यांच्या मागे आई आणि एक भाऊ आहे. तो अविवाहित होता. 

जागतिकीकरणाच्या   युगात  नाथजोगी समाजात परिवर्तन घडवून आणण्याची आवश्यकता आहे. शिक्षणाच्या अभावामुळे हा समाज प्रगतीची मोठी शिखरे पादाक्रांत करू शकलेला नाही. शिक्षण आणि व्यवसायासाठी शासकीय मदतीची या समाजाला नितांत गरज आहे. हा समाज संघर्षमय वाटचाल करताना दिसून येत आहे.
 

►धक्‍कादायक! धुळ्यात मुलं पळविणारी टोळी समजून ५ जणांची हत्या

►माजी नगरसेवक डोंबे यांना चोर समजून मारहाण