होमपेज › Solapur › थांबलेल्या जीपवर मोटार आदळून 5 ठार 

थांबलेल्या जीपवर मोटार आदळून 5 ठार 

Published On: Feb 28 2018 1:11AM | Last Updated: Feb 28 2018 7:34AMसोलापूर : प्रतिनिधी

औरंगाबाद येथून इज्तेमाची दुवा करून रात्री घराकडे परतणार्‍या भाविकांच्या वाहनांना सोलापूर-तुळजापूर रोडवरील हॉटेल शीतलसमोर अपघात होऊन  झालेल्या दुर्घटनेत दोन्ही वाहनांमधील  5 जण ठार झाले, तर 7 जण जखमी झाले. हा अपघात मंगळवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास झाला असून जखमींवर सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये सोलापूरच्या पोलिस कर्मचार्‍यासह दोघे सोलापुरातील असून इतर तिघे हे कर्नाटकातील बसवनबागेवाडी येथील रहिवासी  आहेत. 

जमीर हुसेन दादासाहेब पाटील (वय 32, रा. पेनूर, ता. मोहोळ), महामूद अखलाखपाशा पटेल ऊर्फ पाटील (26, रा. पाटील वस्ती, पेनूर), टिपूसुल्तान उमरसाब छप्परबंद (26, रा. बसवनबागेवाडी, जि. विजापूर, कर्नाटक), अमीर हमजा लाडसाहेब नंदवाडगी (50), अब्दुल हुसेन छप्परबंद (53, दोघे रा. बसवनबागेवाडी, जि. विजापूर) अशी अपघातात मरण पावलेल्यांची नावे आहेत. तर सोहेल मदार राजनाल 18), इस्माईल नबीसाब वालीकर (26), दावलसाब दस्तगीरसाब वालीकर (65), इमामअली मलिकसाब छप्परबंद (50), राजेसाब  हुसेनसाब बागेवाडी (40, सर्व रा. बसवनबागेवाडी, जि. विजापूर), सुलेमान गनीसाब शेख (25, रा. सिद्दापूर, ता. मंगळवेढा), सलमान मसाहजरत पाटील (26, रा. पेनूर, ता. मोहोळ) अशी जखमींची नावे आहेत. अपघातामध्ये  मरण  पावलेले  महामूद पटेल हे सोलापूर शहर आयुक्‍तालयातील विजापूर नाका पोलिस ठाण्यात कार्यरत होते.

औरंगाबाद येथे तब्लीकी जमातचा राज्यस्तरीय इज्तेमा 24, 25 आणि 26 फेब्रुवारी रोजी झाला. सोमवारी दुपारी इज्तेमामध्ये दुवा करण्यात आली. त्यानंतर राज्यातील व परराज्यांतून आलेले भाविक परतीच्या मार्गाला लागले. सोलापूर व कर्नाटकातून गेलेले काही भाविक वाहनांमधून परतू लागले. सोलापूर जिल्ह्यातील जमीर पाटील, महामूद पटेल, सुलेमान शेख, सलमान पाटील हेदेखील त्यांच्या (एमएच 12 सीएक्स 1248) या मोटारीतून रात्री सोलापूरला परत निघाले तसेच कर्नाटकातील बसवनबागेवाडी येथील भाविक (केए 23 एम 4526) या महिंद्रा जीपमधून घराकडे परत निघाले होते.

मंगळवारी  पहाटे  पाचच्या  सुमारास  सोलापूर-तुळजापूर  रोडवरील  हॉटेल शीतलच्या अलीकडे काही अंतरावर  महिंद्रा जीपमधील  भाविकांनी प्रातर्विधीसाठी जीप थांबविली होती. जीपमधील पाच जण खाली उतरले होते, तर तिघे जण हे जीपमध्येच  होते. त्याचवेळी  पाठीमागून  कार  भरधाव  येत होती. जीपपासून काही अंतरावर  मोटारीच्या  आडवे  अचानकपणे  जंगली  रानडुक्‍कर  आले. त्यामुळे कारचालकाला  काय करावे हे सूचेनासे  झाले  व त्याचा कारवरील ताबा सुटला.   त्यामुळे  प्रचंड  वेगात असलेली कार ही  रस्त्याच्या कडेला थांबलेल्या  जीपवर जाऊन आदळली. कारचा वेग खूपच जास्त असल्यामुळे थांबलेली जीप ही पलटी होऊन काही अंतर फरफटत गेली. यामध्ये दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

या  अपघातात  जीपमध्ये  असलेले तीन जण व  मोटारीमधील  दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर जीपमधून खाली उतरलेले  भाविकदेखील  जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच 108 रुग्णवाहिकेतील काशिनाथ हलकुंटे यांनी जखमी व मृतांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात तवतडीने दाखल केले.

या अपघाताची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू, अप्पर अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस  अधिकारी अभय डोंगरे, सोलापूर तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक किशोर नावंदे यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा  सिव्हिल हॉस्पिटल व हॉटेल शीतलजवळ दाखल  झाला. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जखमी व मृतांची पाहणी करून पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळाला भेट दिली. यावेळी मुस्लिमबांधवांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. 

याबाबत  सोलापूर  तालुका पोलिस ठाण्यात  राजासाब हुसेनसाब बागेवाडी (रा. बसवनबागेवाडी) यांच्या  फिर्यादीवरून मोटारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक  खतीब तपास करीत आहेत.

मोटारीच्या प्रचंड वेगामुळे अपघात?
सोलापूर ते औरंगाबाद या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. सोलापूर ते तुळजापूर रस्त्याचे चौपदरीकरण पूर्ण झाले असल्याने या रस्त्यावर वाहनांचा वेग वाढला आहे. मंगळवारच्या अपघातामध्येही मोटारीचा वेग असल्याचे दिसून आले. रानडुकरालाही मोटारीची इतक्या  जोरात धडक बसली आहे की, त्याचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. थांबलेली जीपदेखील फिरून पटली होऊन काही अंतर फरफटत गेली. मोटारीच्या वेगामुळे दोन्ही वाहनांतील पाच जणांना जीव गमवावा लागला.