Thu, Dec 12, 2019 17:21होमपेज › Solapur › ‘उजनी’तून ‘भीमा’त 5 हजार विसर्ग

‘उजनी’तून ‘भीमा’त 5 हजार विसर्ग

Published On: Aug 14 2019 12:09AM | Last Updated: Aug 14 2019 12:09AM
बेंबळे : प्रतिनिधी

उजनी धरणावरील 19 धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस बंद झाल्याने दौंड येथून येणार्‍या विसर्गात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे ‘उजनी’तून भीमा नदीत सोडण्यात येणारा विसर्ग मंगळवारी सकाळी 6 वाजता कमी  करण्यात आला आहे. हा विसर्ग केवळ 5 हजार क्युसेक इतका आहे.

गेल्या आठ दिवसांत उजनी उगम क्षेत्रात चांगला पाऊस पडल्यामुळे वरील धरणांतून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले होते. मागील चार ते पाच दिवस 70 ते 75 हजार क्युसेकने विसर्ग येत होता. त्यामुळे उजनी धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत गेला आणि उजनी धरण 100 टक्के भरले. धरणाच्या वरील भागातून विसर्ग येणे चालूच असल्याने उजनीतून भीमा नदी, कालवा, बोगदा वीजनिर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आला. भीमा नदीत मागील सात ते आठ दिवसांत मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले.

दौंड येथून 73 हजार 564 क्युसेकने येणारा विसर्ग घटून तो 21 हजार 172 क्युसेकपर्यंत खाली आला. त्यामुळे ‘भीमा’तला विसर्ग कमी करण्यात आला आहे.  कालवा, बोगदा व वीजनिर्मितीसाठी विसर्ग चालू आहे.  ‘उजनी’वरील 19 धरणांपैकी 3 धरणांतून केवळ 9 हजार 245 क्युसेकचा विसर्ग येत आहे. आंध्र धरण ः 2250 क्युसेक, खडकवासला  ः 3424 क्युसेक, टेमघर ः 1190 क्युसेक, वरसगाव ः 2381 क्युसेक असा विसर्ग येत आहे. यात चढ-उतार होत आहे.  दौंड व बंडगार्डन येथील विसर्ग झपाट्याने कमी झाला आहे.

गेल्या तीन ते चार दिवसांपासून विसर्ग मोठ्या प्रमाणात घटत गेल्याने पाण्याखाली गेलेली पिके उघडी पडली आहेत. या पाण्यामुळे ऊस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतात गुडघाभर पाणी साचल्याने नव्याने लागवड केलेले ऊस बेणे नासले आहे. ‘उजनी’च्या वरील भागात पावसाने उसंत घेतली असली तरी पश्‍चिम महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्याने शेतकर्‍यांची धास्ती वाढली आहे. पुन्हा मोठा पाऊस झाल्यास ‘उजनी’तून मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडावा लागणार आहे.