Sun, Mar 24, 2019 10:27होमपेज › Solapur › सोलापूर बाजार समितीसाठी सरासरी 49 टक्के मतदान

सोलापूर बाजार समितीसाठी सरासरी 49 टक्के मतदान

Published On: Jul 02 2018 1:50AM | Last Updated: Jul 02 2018 1:50AM सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत रविवारी दक्षिण आणि उत्तर सोलापूर तालुक्यांतील जवळपास 250 मतदान केंद्रांवर मतदान झाले. सकाळपासूनच मतदानासाठी मतदारांचा निरुत्साह दिसून येत होता. त्यामुळे सायंकाळी 5 वाजेपर्यंत या निवडणुकीसाठी सरासरी 49.93 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक कार्यालयाच्या वतीने देण्यात आली.

राज्य शासनाने ज्याच्या नावावर शेतीचा सात-बारा उतारा आहे, अशा शेतकर्‍यांना पहिल्यांदाच या निवडणुकीत मतदानाचा अधिकार दिला होता. त्यामुळे या निवडणुकीत शेतकरी मोठ्या उत्साहाने मतदान करतील, अशी अपेक्षा होती; मात्र शेतकर्‍यांनी मतदानाला म्हणावा तसा प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे सर्वाधिक मतदान हे
 नान्नज गणात झाले असून या ठिकाणी 64.91 टक्के लोकांनी मतदानाचा अधिकार बजावला आहे. तर सर्वात कमी मतदान बोरामणी गणात झाले असून या ठिकाणी केवळ 35.6 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. त्यामुळे थेट शेतकर्‍यांमधून निवडून द्यावयाच्या 15 जागेसाठी 49.15 टक्के तर व्यापारी व आडते मतदारसंघात 88. 28 टक्के मतदान झाले. हमाल तोलार मतदार संघातून निवडून देण्याच्या दोन जागेसाठी सर्वाधिक मतदान झाले असून या ठिकाणी 91 .95 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाचा टक्का घसरल्याने याचा फटका कोणाला बसणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.  

दरम्यान मंगळवारी सोरगाव कॅम्प येथे सकाळी 8 वाजता मतमोजणीस प्रारंभ होणार आहे. त्यामुळे झालेल्या मतदानामध्ये शेतकर्‍यांनी नेमका कोणाला कौल दिला हे मंगळवारी सायंकाळीच लक्षात येणार आहे.